गांधीनगर: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. जगातील सर्वात मोठा पुतळा राष्ट्राला समर्पित करण्यात आला. तब्बल 182 मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचा लोकार्पण सोहळाही तितकाच भव्य आणि दिव्य करण्यात आला.
मोदींनी उद्घाटन भाषणात सरदार पटेलांना वंदन करतानाच, त्यांच्या पुतळ्यावरुन टीका करणाऱ्या विरोधकांना लक्ष्य केलं. देशाची एकता जिंदाबाद अशा घोषणा देताना, महापुरुषांचा सन्मान अपराध आहे का, असा सवाल विरोधकांना केला.
भारताने इतिहास रचला
यावेळी मोदी म्हणाले, “जगातील सर्वोच्च स्टॅचू ऑफ युनिटी उभारुन भारताने इतिहास रचला आहे. देशात असे काहीच क्षण येतात, जे राष्ट्रीय एकतेची जाणीव करुन देतात. सरदार वल्लभभाई पटेलांनी देश एकसंध बांधला. त्यांच्या जयंतीला त्यांच्या जगातील सर्वोच्च स्मारकाचं लोकार्पण करण्याचं भाग्य मिळालं. विराट व्यक्तीमत्त्वाला योग्य स्थान देण्याचं अपुरं स्वप्न आज साकार झालं”.
तीन मराठी माणसांचा गौरव
या कार्यक्रमादरम्यान तीन मराठी माणसांचा उल्लेख आणि गौरव करण्यात आला.
1) छत्रपती शिवाजी महाराज
या भव्य कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दोन मराठमोळ्या व्यक्तींना नमन केलं. त्यामध्ये पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे सरदार पटेलांच्या मूर्तीचे प्रणेते मराठमोळे राम सुतार.
मोदी म्हणाले, “सरदार पटेलांचं सामर्थ्य तेव्हा दिसलं, जेव्हा भारत साडेपाचशे संस्थानांमध्ये विभागला होता. जगभरात भारताच्या भविष्याबाबत निराशा पसरली होती. मात्र त्याचवेळी सरदार पटेल आशेचा किरण बनले. सरदार पटेलांमध्ये कौटिल्याची कूटनीती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य होतं”.
2) राम सुतार यांचा गौरव
यावेळी सरदार पटेल यांच्या यांच्या पुतळ्याचे शिल्पकार मराठमोळे राम सुतार यांचा गौरव मोदींच्या हस्ते झाला. राम सुतार यांनी ही मूर्ती साकारली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी या मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टचं प्रत्यक्ष काम लार्सन अँड टर्बो या कंपनीने केलं. मात्र त्यापूर्वी पुतळ्याचं रेखाचित्र, पटेलांच्या कपड्याच्या घडीपासून ते चेहऱ्यावरील सुरकुत्यापर्यंत सर्व साकारलं ते मराठमोळे राम सुतार यांनी. मूळचे धुळ्याचे असलेले राम सुतार यांनी वयाची नव्वदी पार केली आहे. मात्र हजारो स्मारकं, शिल्पं साकारलेल्या राम सुतार यांनी सरदार पटेलांच्या स्मारकाचं शिवधनुष्य लीलया पेललं. त्यामुळेच त्यांचा गौरव करण्यात आला.
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी ब्राँझच्या आठ मिमी जाडीच्या 7000 हून अधिक शीट्स जोडून या पुतळ्याला आकार देण्यात आला आहे.
3) कला दिग्दर्शक नितीन देसाई
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या भव्य-दिव्य लोकार्पण सोहळ्याचं नेटकं नियोजन करण्याची जबाबदारी मराठी माणसावरच होती. नेत्रदीपक आणि जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या या सोहळ्याला, मराठमोळे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कल्पकतेतून चार चांद लागले.
या कार्यक्रमासाठी नितीन देसाई यांनी जगातील सर्वात मोठी एलईडी स्क्रीन उभारली. भव्य शामयाना, भारदस्त मंच असं सारंकाही नितीन देसाई यांनी उभा केलं.
या भरगच्च कामासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: नितीन चंद्रकांत देसाई यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली.
जगातील सर्वोच्च अशा स्टॅच्यु ऑफ युनिटीचं लोकार्पण होत असताना तसाच डामडौल उभा करण्याचं ध्येय होतं, असं नितीन देसाईंनी टीव्ही9 मराठीला सांगितलं. ‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ ही संकल्पना घेऊन नितीन देसाई यांनी या मंचाची उभारणी केली. हे काम भावनिक होतं, कारण यामध्ये देशाची भावना, देशाचा अभिमान होता. त्यामुळे त्याच जबाबदारीने हे काम केलं, असं नितीन देसाई म्हणाले.