नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘एक देश, एक वर्दी’ (One Nation, One Uniform) हा नवीन नारा दिला आहे. एकसंघ देशात सुरक्षेच्या दृष्टीने एक गणवेश असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावर सर्वांनी एकत्र विचार करावा, हा विचार कोणावर थोपविण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काय दिला आहे मोदी यांनी एकीचा हा मंत्र..
देशातील पोलिसांसाठी एकच गणवेश असावा, असे चिंतन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने नवी दिल्लीत दोन दिवसांचे चिंतन शिबिर आयोजीत करण्यात आले होते.
या चिंतन शिबिरात सर्व राज्यांचे गृहमंत्री सहभागी झाले होते. पंतप्रधानांनी या शिबिरात सर्व राज्यांच्या गृह मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ‘एक देश, एक यूनिफॉर्म’चा नारा दिला.
पंतप्रधानांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी सर्व राज्यांनी एकत्र काम करण्यावर जोर दिला. कायदा आणि व्यवस्थेचा थेट संबंध विकासाशी असतो. त्यामुळे देशात शांतता राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.
प्रत्येक राज्यांनी एकमेकांकडून काहीतरी शिकले पाहिजे. प्रेरणा घेतली पाहिजे आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी एकत्रित काम केले पाहिजे, असा पंतप्रधान मोदी यांनी संदेश दिला.
व्हिजन 2047 आणि पंचप्रण या दोन विषयाला बळकटी देण्यासाठी हे दोन दिवसीय चिंतन शिबिर आयोजीत करण्यात आले होते. पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनी या शिबिराविषयीची घोषणा केली होती.
स्वातंत्र्यपूर्व काळातील कायद्यांची पूनरावलोकन करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. एवढेच नाही त्यात बदल करण्याची आवश्यकताही पंतप्रधानांनी या चिंतन शिबिरात व्यक्त केली.