नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून नुकतीच अग्निपथ योजनेची (Agneepath scheme) घोषणा करण्यात आली आहे. मात्र या योजनेच्या विरोधात बिहारमध्ये (Bihar) जोरदार आंदोलन सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी देखील अनेक जिल्ह्यांमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात तरुण रस्त्यांवर उतरले आहेत. बुधवारी बिहारमध्ये अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. बुधवारच्या आंदोलनानंतर आज देखील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. जहानाबाद (Jehanabad), बक्सर आणि नवादा मध्ये रेलरोको आंदोलन करण्यात आले. तर छपरा आणि मुंगेरमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. पटना -भागलपूर मार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू असून, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. दुसरीकडे नवादाच्या प्रजातंत्र चौकात शेकडो तरुण जमले असून, केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. तरुण रस्त्यावर उतरले असून, टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात येत आहे. अग्निपथ योजनेवर तरुणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
बिहारच्या जहानाबादमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांनी पटना-गया मार्गावर पटना -गया मेमू रेल्वेला अडवले. तसेच स्टेशन परिसरात जाळपोळ देखील करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेण्यात आली. आंदोलन करणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून समज देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. आमदार, खासदार यांचा कालावधी पाच वर्षांचा असतो, मग आम्हाला चार वर्ष का असा सवाल या विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच चार वर्षांच्या सेवा समाप्तीनंतर आम्हाला पेन्शन नसल्याने आम्ही रस्त्यावर येऊ, पुढे आमची जबाबदारी कोण घेणार असे देखील या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
अग्निपथ योजनेंतर्गत सैन्य दलात तरुणांना संधी देण्यात येणार आहे. मात्र त्यांच्या सेवेचा कालावधी हा चार वर्षांचाच असणार आहे. ही भरती मेरिट आणि मेडिकल टेस्टच्या आधारे केली जाणार आहे. या तरुणांना अग्निवीर म्हणून संबोधण्यात येईल. या चार वर्षांच्या काळात या तरुणांना 30 ते 40 हजार एवढे वेतन देण्यात येणार आहे. अग्निपथ योजनेच्या अंतर्गत 17 ते 21 वयोगटातील 45 हजारांपेक्षा अधिक तरुणांची सैन्यात भरती केली जाणार आहे. मात्र ही भरती केवळ चार वर्षांसाठी असणार आहे. यावरून आता बिहारमध्ये आंदोलन पेटले आहे.