रांची | 15 नोव्हेंबर 2023 : जनजाती गौरव दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावेळी एक अघटीत प्रकार घडला. पंतप्रधानांसाठी प्रचंड सुरक्षा असताना देखील एक महिला त्यांच्या कारसमोर अचानक आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसपीजी कमांडो आणि झारखंड पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत काही सेकंदातच या महिलेला बाजूला केले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं. त्यानंतर पंतप्रधानांचा ताफा सुसाट वेगात निघून गेला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यासमोर आलेल्या या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या महिलेची कसून चौकशी केली जात आहे. या महिलेचा अशी कृती करण्यामागचा हेतू काय होता? याचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान, ही महिला पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ खरा असल्याचं कुणीही अधिकृतपणे सांगितेललं नाही. त्यामुळे हा व्हिडीओ खरा असल्याची पृष्टी टीव्ही9 मराठी करत नाही. या व्हायरल व्हिडीओत महिला पंतप्रधानांची सुरक्षा तोडून ताफ्यासमोर येत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी 3 हजाराहून अधिक सुरक्षाकर्मी, एक डझनहून अधिक आयपीएस अधिकारी, डीएसपी, इन्स्पेक्टर रँकचे अधिकारी, झारखंड पोलीस तसेच एसपीजी कमांडो एवढा लवाजमा असतो. एवढं असूनही एक महिला पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर आलीच कशी? असा सवाल केला जात आहे. आता या प्रकरणाची चौकशी झारखंड पोलीस करत आहे. मोदींच्या ताफ्यात घुसणाऱ्या या महिलेचं नाव संगिता झा असं आहे. घरातील त्रासामुळे ही महिला त्रस्त होती. त्यामुळे कुटुंबातील वाद मोदींना सांगण्यासाठी ती रस्त्यावर आल्याचं सांगितलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या झारखंड दौऱ्यावर आले आहेत. 14 नोव्हेंबर रोजी रात्री त्यांनी राजभवनावर आराम केला. झारखंडमध्ये आज जनजातीय गौरव दिन आहे. त्यानिमित्ताने बिरसा मुंडा यांच्या स्मृतीनिमित्त तयार करण्यात आलेल्या संग्रहालयाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान जात होते. पंतप्रधान कारकेड राजभवन येथून निघून रेडियम रोडमार्गे जेल चौकाकडे जात होते. याचवेळी एसएसपी निवासापासून थोड्या अंतरावर गेल्यावर एकाएक रेडियम रोडवर पीएम मोदी यांच्या कारसमोर एक महिला येऊन उभी राहिली.
ही महिला अचानक ताफ्यासमोर आल्यानंतर काही सेकंदासाठी मोदींचा ताफा थांबला. या महिलेला बाजूला केल्यानंतर पुन्हा मोदींचा ताफा निघाला. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक आढळल्याने पंतप्रधान कार्यालयाकडून या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाऊ शकते. या प्रकरणी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. तसेच झारखंड पोलिसांवरही कारवाई केली जाऊ शकते. दरम्यान, सध्या तरी कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.