नवी दिल्ली: राज्यातील सत्तासंघर्षावर आठ महिन्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला नाही. आता या प्रकरणावर येत्या मंगळवारी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10. 30 वाजता ही सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे मंगळवारी या प्रकरणावर नव्याने सुनावणी करण्यात येणार आहे. तसेच हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या बेंचकडे द्यायचं की नाही? यावरही मंगळवारी निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, हे प्रकरण लार्जर बेंचकडे द्यायचं की नाही याबाबत न्यायाधीशांचं एकमत होतं की नाही यावर पुढील निर्णय अवलंबून असणार आहे.
आज सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकालाची सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांनी या प्रकरणावर येत्या मंगळवारी पुढील सुनावणी करणार असल्याचं स्पष्ट केलं. या प्रकरणात आणखी काही मुद्दे असल्याने त्यावर सुनावणी करण्यात येणार असल्याचं कोर्टाने आज स्पष्ट केलं.
अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरण हे या खटल्यात ग्राह्य धरता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या प्रकरणावर सुनावणी सुरू होताना नबाम रेबिया प्रकरण विचारात घेतलं जाणार नाही. त्यामुळे शिंदे गटासाठी मोठा झटका असल्याचं सांगितलं जात आहे.
येत्या मंगळवारी 21 फेब्रुवारी रोजी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सुनावणी होणार आहे. यावेळी सर्वच याचिकांवर ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे मंगळवारपासून या प्रकरणात आणखी काही नवे मुद्दे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, गेल्या आठ महिन्यांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. सुरुवातीला या प्रकरणाची सुनावणी करण्यात येणार आहे. त्यानंतर हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आलं होतं. नंतर हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे देण्यात आलं. आता हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार की नाही हे सोमवारी स्पष्ट होणार आहे.