नवी दिल्ली : कोरोना लसीच्या (Corona Vaccine) किमतीवरुन सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) केंद्र सरकारला सवाल विचारले आहेत. कोरोना लसीच्या किमतीचा मुद्दा गंभीर आहे, गरिबांनी लसीसाठी पैसे कुठून आणायचे असा सवाल कोर्टाने केला. तसंच कोर्टाने केंद्राला मोफत लसीकरणाबाबत विचार करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय जे अशिक्षित आहेत, त्यांनी कोविन अॅपवर (Cowin App) नोंदणी कशी करायची? निरक्षर लोकांसाठी लसीकरणासाठी कोणती व्यवस्था आहे, असा सवालही कोर्टाने विचारला आहे. (Supreme Court tells Centre not to leave vaccine pricing to the manufacturers and Do Not Clamp Down Citizens’ SOS Calls For Medical Help Through Social Media)
न्यायमूर्ती चंद्रचूड, न्यायमूर्ती एल नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती रवींद्र भट यांच्या खंडपीठासमोर देशातील कोव्हिड 19 परिस्थितीबाबत सुनावणी सुरु आहे. किमतीचा मुद्दा खूपच गंभीर आहे, असं न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले.
तुम्ही सर्व व्हॅक्सिन्स का खरेदी करत नाही, असा प्रश्न कोर्टाने केंद्राला विचारला. राज्यांना या लसी अधिक किमतीला विकत घ्याव्या लागतील. आवश्यक औषधांचा तुटवडा आहे. रेमडेसीव्हीरचा तुटवडा आहे. महाराष्ट्र सरकारने मागील वर्षी बांगलादेशातून आवश्यक औषधं मागवली होती. झारखंडनेही बांगलादेशातून 50 हजार रेमडेसीव्हीर खरेदी केली होती. त्यामुळे जी अत्यावश्यक औषधं आहेत, त्यांचं उत्पादन आणि वितरण याचं नियोजन का नीट होत नाही? अशी प्रश्नांची सरबत्ती कोर्टाने केली.
कोरोनाचा नवा म्यूटेंट RTPCR टेस्टमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना ट्रेस करण्याबाबत धोरण काय आहे, अशी विचारणा कोर्टाने केली.
सुप्रीम कोर्टात नागपूरच्या रुग्णाचाही उल्लेख करण्यात आला. 108 नंबरच्या अॅम्ब्युलन्समधून न आल्यामुळे रुग्णालयाने अॅडमिट करुन घेण्यास नकार दिला होता. देशात अॅम्ब्युलन्सची कमतरता आहे, अशावेळी सरकार अशा रुग्णांसाठी कोणती पावलं उचलत आहेत, असा सवाल कोर्टाने केला.
सुप्रीम कोर्टाने सर्व राज्य सरकार आणि पोलीस प्रमुखांना ठणकावून सांगितलं की, जो कोणी व्यक्ती ऑक्सिजन किंवा रुग्णालय अथवा कोणत्याही असुविधेबद्दल सोशल मीडियावर भाष्य करत असेल, तर त्याच्यावर अजिबात कारवाई करु नका. अन्यथा कोर्ट त्यांच्याविरोधात अवमाननेची कारवाई करेल. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारने अशी कारवाई करण्याचा इशारा दिला होता, त्यावरुन कोर्टाने दरडावून सांगितलं.
सुप्रीम कोर्टाने केंद्राला विचारलं, तुम्ही 18-45 वयोगटातील नागरिकांना लस देण्याबाबत नियोजन काय आहे? केंद्राकडे काही योजना आहे का ज्यामुळे लसींच्या किमती समान राहतील? इतकंच नाही तर भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट यांना तुम्ही किती फंड देता याचीही विचारणा कोर्टाने केली.