नवी दिल्ली: वकील आजारी असल्याने सर्वोच्च न्यायालयातील (supreme court) ज्ञानवापीवरील (Gyanvapi Masjid Case) सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ज्ञानवापीवर उद्या शुक्रवारी दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे. तसेच हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली होती. आपलं उत्तर मांडण्यासाठी उद्यापर्यंतची वेळ देण्याची मागणी त्यांनी केली होती. तर, या प्रकरणावर तात्काळ सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम पक्षकाराने केली होती. मात्र, कोर्टाने हिंदू पक्षकारांना म्हणणं मांडण्यासाठी एक दिवसाचा अवधी दिला आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने वाराणासी (varanasi) कोर्टातील सुनावणीला स्थगिती दिली आहे. हिंदू पक्षकारांनी मागणी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे वाराणासी कोर्टातही सुनावणी होणार नाही.
न्यायालयाचे आयुक्त विशाल सिंह यांनी ज्ञानवापी मशिदीतील 15 पानी अहवाल न्यायालयासमोर सादर केला आहे. हा अहवाल सीलबंद कव्हरमध्ये असून तो रवीकुमार दिवाकर यांच्या न्यायालयात सादर करण्यात आला आहे. सोबत तीन सीलबंद बॉक्सेस आहेत. ज्यात आतील व्हिडीओ रेकार्डिंग, फोटो, मेमरी चीप, आणि इतर साहित्य आहे. त्यामुळे या अहवालात नेमकं काय म्हटलंय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ज्येष्ठ वकील हरीशंकर जैन यांना दम्याचा अटॅक आल्याने ते रुग्णालयात अॅडमिट आहेत. त्यामुळे या प्रकरणावरील सुनावणी उद्यावर ढकलण्यात यावी अशी मागणी वकील विष्णू जैन यांनी केली होती. मात्र, आमचं म्हणणं आजच ऐकून घ्यावं, असा आग्रह मुस्लिम पक्षकारांच्या वकिलांनी धरला. कनिष्ठ न्यायालयात भिंत तोडण्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणावर आजच सुनावणी झाली पाहिजे, अशी मागणी मुस्लिम पक्षकाराचे वकील हुफैजा अहमदी यांनी केली आहे. त्यावर सरन्यायाधीशांनी याप्रकरणावर उद्या सुनावणी करणार असल्याचं स्पष्ट केलं. उद्या सर्वोच्च न्यायालयात 50 प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे मला माझ्या सहकारी न्यायाधीशांशी चर्चा करावी लागेल, असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. तर, हुजैफा यांनी अन्य मशिदींनाही सील करण्याचे अर्ज दिले गेले आहेत, याकडे कोर्टाचं लक्ष वेधलं.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने उद्या तीन वाजता सुनावणी ठेवली आहे. तसेच वाराणासी कोर्टाच्या कार्यवाहिलाही स्थगिती दिली आहे. त्यामुळे आज वाराणासी कोर्टात ज्ञानवापीवरील कोणतीही सुनावणी होणार नाही. तसेच याबाबतची माहिती कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश, वकील आणि अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना देण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.