मुंबई | 16 जुलै 2023 : मुंबई सेंट्रल ते सुरत धावणारी देशातील पहिली डबल डेकर (ट्रेन क्र. 12921/12922 ) फ्लाईंग राणीचं ( Flying Rani Express ) रुपडं रविवारपासून बदलले आहे. मुंबई सेंट्रल येथे रेल्वेराज्य मंत्री दर्शना जरदोश ( Darshana jardosh ) यांच्या हस्ते नव्या रुपातील एलएचबी डब्यांच्या ( LHB COACH ) फ्लाईंग राणीचे उद्घाटन करण्यात आले. ही गाडी मुंबई ते सुरत असा रोजचा प्रवास करणाऱ्या हिरे व्यापारी, विद्यार्थी आणि कामगारांची आवडती गाडी म्हणून ओळखली जात होती. आता तिचे दुमजली डबे काढून तिला एलएचबी तंत्रज्ञानाचे डबे लावले आहेत.
नव्या रुपातील मुंबई सेंट्रल ते सुरत फ्लाईंग राणी एक्सप्रेसला आता2 एसी चेअर कार ( आरक्षित ), 7 सेंकड क्लास आरक्षित कोच, 7 अनारक्षित सेंकड क्लास सिटींग, 1 फर्स्टक्लास पासधारकांसाठी, 1 सेंकड क्लास पास धारकांसाठी, 1 कोच महिला पासधारकांसाठी, 1 अनारक्षित कोच महिला प्रवाशांसाठी असे 21 एलएचबी तंत्रज्ञानाच्या डबे जोडले गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना मिळणाऱ्या सेवेच्या दर्जात आणि सुरक्षेत वाढ झाल्याचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.
रविवारी सकाळी मुंबई सेंट्रल स्थानकात प्रतिष्ठित फ्लाइंग राणी एक्सप्रेसने ( नॉन-एसी डबल डेकर रुपात शेवटची फेरी केली. 16 जुलै 2023 च्या संध्याकाळपासून या ट्रेनला LHB-क्लास श्रेणीच्या सुधारित डब्यांसह अपग्रेड केले आहे, परंतु दुर्दैवाने ती आता डबल डेकर नाही. 18 डिसेंबर 1979 रोजी या ट्रेनमध्ये डबल डेकर डबे बसविण्यात आले होते, बरोबर 43 वर्षे सहा महिने 29 दिवस तिला आज झाले. आता पश्चिम रेल्वेवर आता वलसाड फास्ट पॅसेंजर ही एकच शेवटची नॉन-AC डबल डेकर ट्रेन उरल्याचे रेल्वे अभ्यासक राजेंद्र भां.आकलेकर यांनी सांगितले.
ही लोकप्रिय मुंबई ते सुरत फ्लाईंग एक्सप्रेस पहिल्यांदा 1906 ला सुरु झाली होती. नंतर ती मधल्या काळात बऱ्याच वेळा बंद झाली. साल 1950 पासून ती निरंतर सेवा देत आहे, 18 डिसेंबर 1979 रोजी ती देशाती पहिली डबलडेकर ट्रेन झाली. तिला मुंबई – पुणे डेक्कन क्वीनच्या धर्तीवर धावती डायनिंग कार होती, तेथील कटलेट खूपच प्रसिध्द होते अशी आठवण पालघरच्या भाजपा आमदार मनिषा चौधरी यांनी यावेळी सांगितले. फ्लाईंग राणीतून पुन्हा पासधारकांना प्रवासकरता येणार आहे. कोरोनाकाळात ही सेवा बंद केली होती. आता रेल्वेराज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी ही सेवा सुरु करण्यास हिरवा कंदील दिल्याचे आमदार मनिषा चौधरी यांनी सांगितले.