नवी दिल्ली | 10 फेब्रुवारी 2024 : राजधानी दिल्लीमध्ये 9 फेब्रुवारीपासून ‘सुशासन महोत्सव‘ पार पडत असून आज त्याचा दुसरा दिवस आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने या सुशासन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते सुशासन काल ( शुक्रवार) महोत्सवाचे उद्घाटन झाले. कालप्रमाणेच आजही या महोत्सवात देशातील नामवंत नेते सहभागी होणार असून मोदी सरकारच्या कार्यकाळातील विकास आणि सुशासनाचे महत्त्व अधोरेखित करणार आहेत. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, अर्थात आज ज्या व्यक्तींचा सहभाग असणार आहे, त्यामध्ये नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, आरएमपीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि नागालँडचे पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री तेमजेन इमना अलांग यांचा समावेश आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय सुशासन महोत्सवाचे आयोजन दिल्लीतील जनपथ रोडवरील आंबेडकर इंटर नॅशनल सेंटरमध्ये करण्यात आले आहे. या महोत्सवात मोदी सरकारच्या काळातील गेल्या 10 वर्षांच्या सुशासनावर प्रकाश टाकण्यात येईल, तो रेखांकित करण्यात येईल. मोदी सरकारच्या कार्यकाळातील सर्व क्षेत्रातील विकासकामांचे आणि सुशासनाचे प्रमुख मुद्दे देशासमोर मांडणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. TV9 Bharatvarsh या महोत्सवाचा अधिकृत मीडिया पार्टनर आहे.
सुशासन महोत्सवातील आजचे कार्यक्रम
सुशासन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा, अर्थात आजचा कार्यक्रम सकाळी 10.30 पासून सुरू होणार असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालेल. सकाळी 10.30 ते 11.15 या वेळेत सार्वजनिक मुलाखतीत नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम बोलतील. तर 11.15 ते 12.15 पर्यंत जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची मुलाखत होईल. दुपारी 12.15 ते 1 वा. सर्व राज्यातील स्टॉल्सचे प्रतिनिधी येऊन एकत्र चर्चा करणार आहेत.
त्यानंतर दुपारी 1 ते 2 ही वेळ जेवणासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
दुपारी 2 ते 3 या वेळेत नागालँडचे पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री तेमजेन इमना अलांग यांची मुलाखत होणार आहे.
दुपारी 3 ते 4 पर्यंत आरएमपीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांची मुलाखत होईल.
दुपारी 4 ते संध्याकाळी 5 या वेळेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुलाखत पार पडणार आहे.
संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची मुलाखत होईल.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी या दिग्गजांनी घेतला सहभाग
9 आणि 10 असा दोन दिवस असलेल्या या सुशासन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले. मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेली विकासकामे आणि सुशासनाचे प्रमुख मुद्दे यावर सर्वांनी आपापली मते मांडली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, यांनी सुशासन महोत्सवाचे अध्यक्षपद भूषवले. ते पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरएमपीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि पूनावाला फिनकॉपचे एमडी अभय भुतडा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी सर्वांनी आपापली मते मांडली.