Loksabha Election 2024 | भाजप लोकसभा उमेदवारांच्या यादीचा सस्पेंस संपला, पहिली यादी शनिवारी? या नेत्यांच्या नावाची चर्चा

| Updated on: Feb 28, 2024 | 8:05 PM

भारतीय जनता पक्षाने (BJP) अद्याप लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. भाजपची पहिली यादी कधी जाहीर होणार याबाबत संभ्रम आहे. आता भाजपच्या पहिल्या यादीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

Loksabha Election 2024 | भाजप लोकसभा उमेदवारांच्या यादीचा सस्पेंस संपला, पहिली यादी शनिवारी? या नेत्यांच्या नावाची चर्चा
AMIT SHAH, PM MODI AND J.P.NADDA
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 28 फेब्रुवारी 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी देशातील अनेक पक्षांनी आपापल्या पक्षांची उमेदवार यादी जाहीर केली आहे. आप, समाजवादी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस यासारख्या पक्षांनी उमेदवार जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली आहे. काही राज्यांमध्ये कॉंग्रेस सोबत आघाडी केलेल्या पक्षांची जागावाटपाची चर्चा सुरु आहे. परंतु, देशात अब की बार, 400 पार हा नारा देणाऱ्या भाजप उमदेवारांच्या यादीकडे देशाचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपची पहिली यादी तयार झाली आहे. या यादीत सुमारे 150 नेत्यांची नावे निश्चित करण्यात अली आहे. त्यांच्या नावाची घोषणा येत शनिवारी होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 14 राज्यांच्या कोअर ग्रुपची बैठक बुधवारी नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीमध्ये भाजप उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. बुधवारी दिवसभर भाजप मुख्यालयात गोंधळ सुरू होता. कोअर ग्रुपच्या बैठकीमध्ये हिंदी पट्ट्यातील 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश राज्यातील नेत्यांचा समावेश होता.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्यांच्या कोअर ग्रुपच्या बैठकीत सहभागी झाले होते. राज्यांनी पाठवलेल्या प्रत्येक जागेसाठी तीन उमेदवारांच्या पॅनलच्या नावांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच, या निवडणुकीत जास्तीत जास्त नवीन चेहरे देण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

अनेक नामवंत चेहऱ्यांचा समावेश

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या पहिल्या यादीत अनेक नामवंत चेहऱ्यांची नावे समाविष्ट केली जाऊ शकतात. एनडीए आघाडी असलेल्या राज्यांतील उमेदवारांची पहिल्या सीआयसीमध्ये चर्चा होणार नाही. तसेच, कमकुवत नेत्यांची तिकिटे कापली जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तर, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया, नरोत्तम मिश्रा, बीडी मिश्रा, कैलाश विजयवर्गीय या नेत्यांची नावे वेगवेगळ्या ठिकाणांहून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पॅनेलमध्ये दिसली आहेत.

केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर गुरुवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे कारण याच बैठकीत उमदेवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. त्यानंतर लगेचच भाजप उमेदवारांची नावे जाहीर केली जाऊ शकतात. भाजपच्या पहिल्या यादीत सुमारे 150 नेत्यांची नावे असल्याची माहितीही मिळालीय.