Bagmati Express Accident : म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक, ट्रेनच्या डब्यांना आग, अनेक जखमी

| Updated on: Oct 12, 2024 | 8:19 AM

तामिळनाडूमध्ये कावरापेट्टई जवळ म्हैसूर येथून दरभंगा येथे जाणाऱ्या बागमती एक्स्प्रेसची मालगाडीशी भीषण टक्कर झाली.अपघातानंतर ट्रेनला आग लागली. या अपघाामध्ये 19 प्रवासी जखमी झाले आहेत.

Bagmati Express Accident : म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक, ट्रेनच्या डब्यांना आग, अनेक जखमी
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक
Image Credit source: ANI
Follow us on

तामिळनाडूमध्ये शुक्रवारी रात्री (11 ऑक्टोबर) एक भीषण अपघात झाला आहे. म्हैसूर येथून दरभंगाच्या दिशेने जाणाऱ्या बागमती एक्स्प्रेसने ट्रॅकवर उभ्या असलेल्या ट्रेनला जोरदार धडक दिली. या अपघातात एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळांवरून खाली घसले. तसेच ट्रेनच्या काही डब्यांना आगही लागली. या अुघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी 19 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी रात्री 8.30 ते 9 च्या दरम्यान हा अपघात झाल्याचे समजते. चेन्नई रेल्वे विभागातील पोनेरी कावरपेट्टई विभागात एक्सप्रेस ट्रेन आणि मालगाडी यांच्यात झालेल्या धडकेत कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलले.

अपघातानंतर ट्रेनच्या डब्यांना आग

मिळालेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तिरुवल्लूर जिल्ह्यातील पोनेरी स्टेशन ओलांडल्यानंतर म्हैसूर दिब्रुगड दरभंगा एक्सप्रेसला पुढे जाण्यासाठी हिरवा सिग्नल देण्यात आला.पण “कावरपेट्टाई स्थानकात प्रवेश करत असताना, ट्रेनच्या कर्मचाऱ्यांना जोरदार धक्का बसला आणि दिलेल्या सिग्नलनुसार मेन लाइनमध्ये जाण्याऐवजी 75 किमी प्रतितास वेगाने धावणारी ही एक्स्प्रेस ‘लूपलाइन’ मध्ये गेली आणि तिथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. ही ट्रेन म्हैसूर येथून पेरम्बूरमार्गे बिहारमधील दरभंगाला जात होती. रात्री एक्सप्रेसने मालगाडीला धडक दिल्यानंतर 13 डबे रुळावरुन घसरले, तर काही डब्यांनी पेट घेतला.

या अपघाताची बातमी समजताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तसेच बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य वेगाने सुरू केले. अपघात स्थळी तातडीने रुग्णवाहिका आणि एनडीआरएफ तुकड्याही पाठवण्यात आल्या. या अपघातात आत्तापर्यंत 19 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

“आम्हाला रेल्वे अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर वेगाने मदतकार्य सुरू करण्यात आले. संपूर्ण ट्रेनमधून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झालेली नाही. सर्व प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यात आले आहे. यासाठी रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. प्रवाशांसाठी जेवण, पाणी, नाश्त्याची पुरेशी सोय करण्यात आली आहे, ” असे रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

उपमुख्यमंत्री स्टालिन यांनी घेतली जखमींची भेट

दरम्यान तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टालिन यांनी या अपघातातील जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपसू केली. काही जखमींवर चेन्नईच्या सरकारी स्टॅनले मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या अपघात आणि आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर रेल्वे विभागातर्फे दरभंगा रेल्वे स्थानकावर रेल्वेतील प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले. याशिवाय टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. दरम्यान हा अपघात नेमका का, कसा झाला त्यामागचे कारण शोधण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती मिळत आहे.