हैदराबाद | 4 डिसेंबर 2023 : तेलंगणमध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर विमानाने पेट घेतला. घटनास्थळावरून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये अपघातानंतर विमान जळून खाक झाल्याचे दिसत आहे.
तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील तुप्रन शहरात सोमवारी सकाळी भारतीय वायुसेनेचे (IAF) पायलटस ट्रेनर विमान कोसळले. या दुर्घटनेत दोन वैमानिक ठार झाले, असे IAF अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडीगुल जिल्ह्याजवळील एअर फोर्स अकादमीमध्ये सोमवारी सकाळी प्रशिक्षण सुरू होते. त्यावेळी 8.55 च्या सुमारास हा अपघात झाला. मृत वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश आहे.
हे विमान तूप्रनजवळ कोसळले. ” डंडीगुल विमानतळावरून निघालेले हे एक ट्रेनर विमान होते. अपघातावेळी त्यामध्ये एक प्रशिक्षक आणि ट्रेनी कॅडेटचा समावेश होता. विमान खाली कोसळताच भीषण आग लागली. विमानतळ कर्मचारी आणि क्लू टीम घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनीही धाव घेत आग आटोक्यात आणली असे अधिकाऱ्यांनी सांगितले.