हैदराबाद | 3 डिसेंबर 2023 : तेलंगाणा विधानसभा निवडणूकीचा निकाल एक्झिट पोलच्या अंदाजावर खरा उतरला. मत मोजणीची आकडेवारी समोर येत आहे. काँग्रेसने राज्यात बाजी मारली आहे. गेल्या दहा वर्षांच्या केसीआरच्या गडाला काँग्रेसने सुरुंग लावला. बीआरएस या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर आहे. पण या निवडणुकीत भाजपने दखल घ्यायला लावली आहे. जे निकाल आले आहेत, त्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. गेल्यावेळी 2018 मध्ये भाजपला या राज्यात केवळ एक उमेदवार निवडून आणता आला होता. भाजपला यावेळी 11 जागांवर आघाडी मिळाली आहे. या विधानसभा निवडणुकीत अससुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीनने (AIMIM) रान पेटवले होते. भाजपविरोधात जोरदार प्रचार केला होता. पण ओवेसींच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यात भाजपला यश आले. केसीआर यांना जसा हा झटका तसाच ओवेसी यांना पण धक्का आहे.
या मुद्यांवर केला प्रचार
तेलंगाणा विधानसभा निवडणुकीत खरा सामना भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेस यामध्ये रंगला. मग भाजपने या राज्यात यश कसे मिळवले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यात निवडणूक प्रचाराचा अगोदरच नारळ फोडला होता. अनेक सभा घेतल्या. त्यांनी राज्यात राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्याची घोषणा केली. अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती. काँग्रेस आणि बीआरएस यांच्या अपयशाची उजळणी केली.
मुस्लीम मतदार कोणाकडे?
सुरुवातीचा कल पाहता अकबरुद्दीन ओवेसी यांच्याशिवाय कोणताच उमेदवार मोठ्या फरकाने समोर दिसत नाही. अकबरुद्दीन हे चंद्रयानगुट्टा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत शहरातील मुस्लीम मतदाराने भाजप तर ग्रामीण भागात काँग्रेसला मतदान केल्याचे समोर येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या निवडणुकीत ओवेसी यांचा पक्ष मते फोडणारा अशी होण्याची शक्यता पण वर्तविण्यात येत आहे.
भाजप अशी ठरली बाजीगर
119 जागांवर तेलंगाणा विधानसभेत भाजपला अजून त्यांचे अस्तित्व सिद्ध करता आले नाही. राजकारण अजूनही भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेस यांच्या अवतीभोवती फिरत आहे. एका उमेदवारापासून ते 11 जागांपर्यंत आघाडीची ही आकडेवारी भाजपला सुखावणारी आहे. भाजपच्या मतदानाची टक्केवारी 13.76 टक्के इतकी झाली आहे.