हैदराबाद : पाणीपुरी हा सगळ्यांचाच आवडता खाद्यपदार्थ. अनेक जण पाणीपुरीचे शौकीन आहेत. मात्र, अस्वच्छ ठिकाणाहून पाणीपुरी खाल्ल्यामुळे याचा नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे अनेक प्रकार घडतात. असाच एक युक्तीवाद तेलंगणाच्या(Telangana) आरोग्य विभागाने केला आहे. आरोग्य विभागाचा युक्तिवाद ऐकून पाणीपुरी खाताना दहावेळा विचार कराल. पाणीपुरी खाल्ल्याने टायफाइडचा धोका वाढतो असा दावा तेलंगणा आरोग्य विभागाने केला आहे. या दाव्यामुळे पाणीपुरी खवय्यांमध्ये नाराजी पसरली आहे. 10-15 रुपयांच्या पाणीपुरीसाठी तुम्हाला 5-10 हजार रुपये खर्च करावे लागतील असे म्हणत तेलंगणा आरोग्य विभागाने पाणीपुरी खाणाऱ्यांना सावध केले आहे.
तेलंगणामध्ये साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात टायफाइडचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यभरात टायफाइडच्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद होत आहे. तेलंगणा आरोग्य विभागाच्या उच्च आरोग्य अधिकाऱ्याने टायफाइडच्या वाढत्या रुग्णसंख्येला पाणीपुरी जबाबदार असल्याचा दावा केला आहे.
तेलंगणाचे सार्वजनिक आरोग्य संचालक डॉ. श्रीनिवास राव म्हणाले की, टायफाइडला पाणीपुरी रोग असे म्हटले जाऊ शकते. टायफाइड आणि इतर साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी सध्याच्या पावसाळ्यात पाणीपुरी आणि इतर रस्त्यावरील खाद्यपदार्थ टाळावे असा सल्ला राव यांनी दिला आहे.
अनेकांना रस्त्यालगतच्या ठेल्यांवर आणि दुकानात पाणीपुरी खाण्याची सवय आहे. मात्र, याच सवयीचा तुमच्या आरोग्यावर विपरात परिणाम होऊ शकतो. तुम्हाला पाणीपुरी 10-15 रुपयांना मिळू शकते, पण उद्या तुम्हाला 5,000-10,000 रुपये खर्च करावे लागतील असे म्हणत त्यांनी नागरीकांना पाणीपुरी न खाण्याचे आवाहन केले आहे.
ठेल्यांवर, तसेच फूड स्टॉलवरील विक्रेत्यांनीही स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. पिण्याच्या पाण्याचा वापर सुनिश्चित करावा, अशा सूचना देखील राव यांनी खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दिल्या आहेत.
दूषित अन्न, पाणी आणि डास यामुळे साथीच्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे मलेरिया, तीव्र अतिसार (ADD) आणि विषाणूजन्य ताप होतो. गेल्या काही आठवड्यांत अशा मोठ्या प्रमाणात प्रकरणे समोर आली आहेत. या महिन्यातच राज्यभरात अतिसाराचे 6 हजार रुग्ण आढळले आहेत. राव यांनी लोकांना ताजे अन्न खाण्याचा आणि उकळलेले पाणी पिण्याचा सल्लाही दिला आहे.
आपल्याला पाणीपुरी आणि त्याच्या पाण्याचे बरेच फायदे मिळू शकतात. जर, तुम्ही पुदीना, जिरे आणि हिंगाचा वापर करून घरच्या घरी पाणीपुरीचे पाणी तयार केले, तर ते आपल्या पचनास उपयुक्त ठरेल. या पाण्यात आपण हिरवी ताजी कोथिंबीर देखील टाकू शकता. याने आपल्या शरीराला येणारी सूज कमी होईल.
पाणीपुरीच्या पाण्यातील हिंग मासिक पाळी दरम्यान येणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करते. तसेच यातील जिरे पचन क्रिया सुधारण्यास मदत करते. पाणीपुरीच्या पाण्यात पचनास फायदेशीर ठरणारे अनेक गुणधर्म आहेत. यातील जिरे तुमच्या तोंडाला गंध देखील प्रतिबंधित करते. पुदिन्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट असतात जे पचनास मदत करतात. यामुळे पोटातील वेदना देखील कमी होतात आणि अपचन नियंत्रित करण्यास मदत होते. इरिटेबल बाउल सिंड्रोम असलेल्या रूग्णांसाठी हे अतिशय फायदेशीर आहे (Health benefits of panipuri aka golgappa).