मुंबई : देशातील आर्थिक राजधानी मुंबईतून आणखी एक महत्वाची सरकारी संस्था दिल्लीत हलविण्यात येत आहे. मुंबईतील वस्रोद्योग आयुक्तालय आता दिल्लीत हलविण्यात येणार आहे. यापूर्वीही मुंबईतून अनेक महत्वाची कार्यालये अन्यत्र हलविण्यात आली आहेत. मुंबईतून अनेक महत्वाच्या संस्था अन्य राज्यात हलविण्यात येत असल्याने मुंबईचे महत्व कमी करण्यात येत असल्याचा आरोप आघाडी सरकारने केला आहे. यामुळे विधीमंडळातही आरोप प्रत्यारोप झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
केंद्र सरकारने मुंबईतील टेक्स्टाईल कमिशनर कार्यालयाला आता दिल्लीत हलविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय वस्रोद्योग मंत्रालयाच्या अंडर सेक्रेटरी जयश्री शिवकुमार यांनी मुंबईस्थित टेक्सटाईल कमिशनर रूप राशी यांना पत्र लिहिले असल्याचे वृत्त हिंदूस्थान टाईम्सने प्रसिद्ध केले आहे. केंद्र सरकारने आर्थिक राजधानी मुंबईतील अनेक महत्वाची कार्यालय यापूर्वी अन्य राज्यात हलविली आहेत. आता वस्रोद्योग आयुक्तालयाला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
टेक्स्टाईल कार्यालय आणि टेक्सटाईल कमिटीची पुर्नरचना करून ते अधिक कार्यक्षम करण्यासाठी हा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचा दावा करण्यात आला आहे. या निर्णयांतर्गत टेक्स्टाईल आयुक्तांसह त्यांच्या हाताखालील काही महत्वाच्या पदांनाही केंद्रीय वस्रोद्योग मंत्रालयात स्थानांतर करण्यात येणार आहे. टेक्स्टाईल कमिशनर सोबत एक जॉईंट टेक्सटाईल कमिशनर, दोन डेप्युटी सेक्रेटरी लेव्हल ( डायरेक्टर रॅंक ) आणि दोन डेप्युटी डायरेक्टर लेव्हल ऑफीसरना दिल्लीत हलविण्यात येणार असल्याचे संबंधित वृत्तात म्हटले आहे. नविन निर्णयानूसार नविन टेक्स्टाईल आयुक्त दिल्लीत वस्रोद्योग मंत्रालयात बसतील तर अन्य अधिकारी रिजनल ऑफीस नोयडा येथे हजर होतील असे सूत्रांनी म्हटले आहे. अधिकाऱ्यांना 5 एप्रिल 2023 पर्यंत शिफ्ट होण्यास सांगण्यात आले आहे.
टेक्स्टाईल कमिशनरचे काम
टेक्स्टाईल कमिशनर केंद्रीय वस्रोद्योग मंत्रालयाला प्रधान तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत असतो. देशातील अमृतसर, नोयडा, इंदूर, कोलकाता, बंगळुरू, कोईमतूर, नवीमुंबई आणि अहमदाबाद येथील प्रादेशिक कार्यालयाच्या मदतीने आर्थिक सर्व्हेक्षण करून टेक्सटाईल इंडस्ट्रीच्या आर्थिक स्थितीबाबत सल्ला देण्याचे काम टेक्सटाईल कमिशनर करीत असतो.
दुसऱ्या जागतिक महायुद्धात स्थापना
टेक्स्टाईल आयुक्तालयाची स्थापना 1943 मध्ये दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान करण्यात आली होती. सैन्य आणि नागरिकांना कापड पुरविण्यासाठी हे आयुक्तालय स्थापन करण्यात आले होते. युद्ध संपल्यानंतर कापड दर ठरविणे आणि त्यांचे नियोजन करण्याचे काम त्यांच्याकडे आले. महाराष्ट्र मोठे टेक्सटाईल सेंटर आहे. मुंबईत त्याची आर्थिक राजधानी आहे. आता कापड उद्योग इचलकरंजी आणि भिवंडीत शिफ्ट झाला आहे. केंद्राने अनेक कार्यालये मुंबईतून दिल्ली आणि अहमदाबादला हलविली आहेत. राज्य सरकारने याबद्दल आवाज उठवला पाहीजे अशी प्रतिक्रीया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.