नवी दिल्ली | 20 ऑगस्ट 2023 : टोमॅटोच्या दरवाढीकडे (Tomato Rate Hike) सुरुवातीच्या काळात उपाय करण्यास वेळ लागला. त्यामुळे ग्राहकांना महागाईचे चटके बसले. तर अनेक घरातून टोमॅटो हद्दपार झाला. ऑगस्ट महिन्यात अखेर केंद्र सरकारने नेपाळमधून टोमॅटो आयातीला परवानगी दिली. त्यामुळे गगनाला भिडलेले भाव दणकावून आपटले. अवकाळी आणि मुसळधार पावसाने सर्वच पिकांचे गणित बिघडवले आहे. त्यात कांद्याचा क्रमांक (Onion Price) लागण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. त्यामुळे केंद्र सरकार अगोदरच सजग झाले आहे. कांद्यामुळे येत्या निवडणुकीत फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारने आतापासूनच महागाई कमी करण्यासाठी कसरत सुरु केली आहे. भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकार टोमॅटोसारखीच कांद्याची विक्री करणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 5 लाख मॅट्रिक टनचा बंपर स्टॉक खरेदी केला आहे. सोमवारपासून NCCF देशात कांद्याची विक्री करणार आहे. इतका असेल एक किलोचा भाव..
इतकी केली कांद्याची खरेदी
किंमत नियंत्रीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने काद्यांचा बंपर स्टॉक खरेदी केला आहे. आता केंद्र सरकार 3 लाख मॅट्रिक टन (LMT) ऐवजी 5 लाख मॅट्रिक टन कांद्याचा साठा केला आहे. शनिवारी 19 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क लावले. भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ लिमिटेड,नाफेड हे देशात कांद्याची विक्री करतील.
स्वस्तात कांद्याची विक्री
टोमॅटोनंतर कांदा स्वस्तात विक्री होणार आहे. किफायतशीर भावात कांद्याची विक्री करण्यात येईल. 21 ऑगस्ट रोजी केंद्र सरकार 25 रुपये किलो भावाने काद्यांची विक्री करेल. भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ लिमिटेड,नाफेड त्यासाठी प्रयत्न करणार आहे.
अजून एक लाख टन कांदा खरेदी
सध्या केंद्र सरकार 3 लाख मॅट्रिक टन (LMT) ऐवजी 5 लाख मॅट्रिक टन कांद्याचा साठा केला आहे. ग्राहक संरक्षण मंत्रालयाने दोन्ही सहकारी संस्थांना 1 लाख टन कांदा अतिरिक्त खरेदी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे येत्या काळात काद्यांचा भाव वाढणार नाही याची काळजी केंद्र सरकार घेत आहे.
राज्यांना काद्यांचा पुरवठा
काही राज्यात आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये काद्यांच्या किंमती सरासरीपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी काद्यांचा पुरवठा वाढविण्यात आला आहे. आतापर्यंत 1,400 मॅट्रिक टन कांदा बाजारपेठेत पाठविण्यात आला आहे. अजून पुरवठा करण्यात येणार आहे.
कांद्यावर 40% एक्सपोर्ट ड्यूटी
कांद्याच्या किंमती वाढण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर शुल्क आकारले आहे. केंद्र सरकारने काद्यांवर 40% एक्सपोर्ट ड्यूटी (Export Duty) लावण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2023 रोजीपर्यंत हे शुल्क आकारण्यात येणार आहे.