छत गळतंय… हॉलमध्ये साप; गोवा अकादमीच्या पुनर्विकासावरून वादावादी

| Updated on: Jan 31, 2024 | 8:15 PM

गोवा कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर हॉलचं छत गळू लागलं आहे. या हॉलमध्ये साप निघाल्याचा कथित व्हिडीओही व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या अकादमीचा पुनर्विकास करूनही ही अवस्था झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी अकादमीच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे. या विकासाच्या नावाने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असून हे सर्व पैसे पाण्यात गेल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.

छत गळतंय... हॉलमध्ये साप; गोवा अकादमीच्या पुनर्विकासावरून वादावादी
Goa Kala Academy
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

पणजी | 31 जानेवारी 2024 : गोवा कला अकादमीच्या पुनर्निर्माणाचा वाद पुन्हा निर्माण झाला आहे. कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कला मंदिराच्या सभागृहाची छत लीक झाल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. त्यानतंर सभागृहातील सीटच्या खाली एक साप आढळून आल्याचा कथित व्हिडीओही व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. कला अकादमीचा पुनर्विकास नेमका झालाच कसा? असा पुनर्विकास कोणी करतं का? असा सवाल विरोधकांनी केला आहे.

या व्हिडीओची कोणतीही पृष्टी केली जात नाही. पण सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कला अकादमीच्या सभागृहात पाणी गळत असल्याचं दिसत आहे. पंखे अस्तव्यस्त पडले आहेत. तर दुसऱ्या एका व्हिडीओत सीट खाली साप आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सरकारी आणि प्रतिष्ठेच्या वास्तुचीच अशी हेळसांड असेल तर बाकीच्या गोष्टींवर न बोललेलंच बरं असंही या निमित्ताने म्हटलं जात आहे.

येथे पाहा ट्वीटरवरील पोस्ट –

400 कोटी खर्च

या मुद्द्यावरून आम आदमी पार्टीने थेट सरकारलाच धारेवर धरलं आहे. ही कला अकादमी इतिहास आणि कलेचा उत्कृष्ट नमूना आहे. या सरकारने तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य सरकारने केवळ अर्धवट पुनर्विकास झालेल्या कला अकादमीचं उद्घाटन केलं. अकादमीची छत कोसळलेली आहे. ती तशीच आहे. या कला अकादमीच्या पुनर्विकासावर 400 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. एवढा पैसा खर्च करूनही कला अकादमीची अवस्था पूर्वीसारखीच आहे. ही अकादमी आता काही लोकांसाठी कुरण ठरत आहे, अशी टीका आम आदमी पार्टीने केली आहे.

जवाब दो

या कला अकादमीचा पुनर्विकास करण्यासाठी कोणतंही टेंडर काढण्यात आलं नव्हतं. जेव्हा अकादमीच्या विकासासाठीच्या टेंडरबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा ताज महल सुद्धा विना टेंडर बनवण्यात आला होता, अशी उत्तरं देण्यात आली होती. कोणत्याही निविदा प्रक्रियेशिवाय हा पुनर्विकास करण्यात आला आहे. त्यातून संबंधितांनी किती भ्रष्टाचार केला हे दिसून येतं. याबाबत राज्य सरकारने गोव्यातील जनतेला जाब दिला पाहिजे, असं आपने म्हटलं आहे.

अकादमीची अवस्था अत्यंत वाईट

ही अकादमी आधी वास्तू कलेचा एक उत्कृष्ट नमूना होती. पण आता अकादमीची स्थिती अत्यंत वाईट आहे. ही अकादमी असुरक्षित झाली आहे. एवढेच नव्हे तर अकादमीची छत कधीही कोसळू शकते, अशी भीती आपचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी व्यक्त केली.

मग परीक्षण का केलं नाही?

गोवा फॉरवर्ड पार्टीचे जनरल सेक्रेटरी दुर्गादास कामत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमच्या पक्षाने कला अकादमीबाबत सातत्याने आवाज उठवला आहे. गेल्या वर्षी जेव्हा अकादमीची छत कोसळली होती तेव्हा सांस्कृतिक मंत्र्याने तो टेंडरचा भाग नव्हता असं सांगितलं होतं. जर हा टेंडरचा भाग नव्हता तर मंत्र्यांनी जाऊन त्याचं परीक्षण का केलं होतं? त्यावेळी आमच्या नेत्यांनी एक व्हिडीओ दाखवला होता, असं दुर्गादास कामत यांनी म्हटलंय.

तर सभागृहात पूरस्थिती

सभागृहाच्या छतावरून पाणी पाझरताना दिसत आहे. मंत्री मात्र खराब फायर हायड्रेंट व्हॉल्वमुळे झाल्याचं सांगत आहेत. असं असेल तर मग त्यांनी फायर हायड्रंटचं परीक्षण न करता अकादमी कशी उघडली हा प्रश्न आहे. यावरूनच जे काही काम झालंय ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे हे स्पष्ट होतंय. या बांधकामावेळी बोअरवेलही खोदण्यात आल्या होत्या. त्यामुळे पावसाळ्यात जर पाणी वाढलं तर सभागृहात पुरस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीतीही कामत यांनी व्यक्त केलीय.