काठमांडू | 31 डिसेंबर 2023 : जगातील अनेक देश 1 जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात मानतात. भारतासह जगातील 200 हून अधिक देश ग्रेगोरियन कॅलेंडरचे (Gregorian calendar) पालन करतात. संपूर्ण जग ग्रेगोरियन कॅलेंडरचे अनुसरण करते, त्यानुसार 2024 हे 31 डिसेंबर नंतर नवीन वर्ष म्हणून येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही सर्व प्रकारचे व्यवसाय वगैरे या दिनदर्शिकेनुसारच केले जातात. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर 2024 वर्षाचे स्वागत करण्याची तयारी सगळे करत आहेत. पण, जगात असा एक देश आहे जो ग्रेगोरियन नव्हे तर फक्त हिंदू कॅलेंडर पाळतो. हे कॅलेंडर त्या देशात शंभरहून अधिक वर्षांपासून चालत आले आहे.
भारतात हिंदू कॅलेंडरचा दीर्घ इतिहास आहे. मात्र, भारतातही ग्रेगोरियन कॅलेंडरचे पालन केले जाते. पण, जगातील एकमेव असा देश आहे जो ग्रेगोरियन कॅलेंडर पाळत नाही. हा देश फक्त हिंदू कॅलेंडर पाळतो. या देशाचे नाव आहे नेपाळ. हिंदू धर्माचे विक्रम संवत कॅलेंडर हे नेपाळचे अधिकृत कॅलेंडर आहे.
हिंदू कॅलेंडर हे विक्रम संवत कॅलेंडरचे लोकप्रिय नाव आहे. हे कॅलेंडर भारतातही दीर्घकाळ चालू होते. परंतु, स्वातंत्र्यानंतर जेव्हा देशाला कॅलेंडर स्वीकारण्याचा निर्णय घ्यावा लागला तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ग्रेगोरियनसह विक्रम संवत स्वीकारले. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर उर्वरित जगाशी समन्वय राखण्यासाठी त्यांनी ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले.
भारताप्रमाणेच नेपाळ हे सुद्धा हिंदू राष्ट्र आहे. पण, नेपाळने विक्रम संवत कॅलेंडरचे पालन केले आहे. नेपाळ राष्ट्र कधीच इंग्रजांचे गुलाम नव्हते म्हणूनच हे राष्ट्र नेहमी विक्रम संवताचे पालन करत आहे. नेपाळमध्ये ब्रिटीशांची सत्ता नसल्यामुळे ते आपल्या परंपरा नेपाळवर लादू शकले नाहीत. कॅलेंडर हे देखील याचे एक उदाहरण आहे. आजही शतकानुशतके नेपाळ राष्ट्र विक्रम संवतचे पालन करत आहे. विशेष म्हणजे विक्रम संवत हे ग्रेगोरियन कॅलेंडरच्या 57 वर्षे पुढे आहे.
नेपाळमध्ये विक्रम संवतचा अधिकृत वापर राणा घराण्याने 1901 मध्ये सुरू केला. हिंदू धर्मात या कॅलेंडरला भारतातील उज्जैन राज्यात 102 ईसा पूर्वमध्ये जन्मलेल्या राजा विक्रमादित्य यांचे नाव देण्यात आले. नेपाळच्या कॅलेंडरमध्ये नवीन वर्ष मार्चच्या शेवटी किंवा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या एप्रिलच्या सुरुवातीला सुरू होते. हे कॅलेंडर चंद्राची स्थिती आणि सूर्याभोवती पृथ्वीच्या क्रांतीच्या वेळेवर आधारित आहे. बरेच लोक याला पंचाग असेही म्हणतात.
विक्रम संवत कॅलेंडरमध्ये आठवड्यात फक्त सात दिवस असतात आणि साधारणपणे वर्षात 12 महिने असतात. पण, कधी कधी वर्ष 13 महिनेही चालते. विक्रम संवताची सुरुवात राजा भर्तृहरी यांनी केली. विक्रमादित्य त्यांचा धाकटा भाऊ होता. भर्तृहरीचा त्याच्या पत्नीने विश्वासघात केला. यामुळे दु:खी होऊन त्याने संन्यास घेतला आणि राज्य विक्रमादित्याकडे सोपवले. राजा विक्रमादित्य हा अतिशय लोकप्रिय राजा होता. त्यांच्या नावावरून संवत हे नाव पडले आणि ते लोकप्रिय झाले अशी आख्यायिका आहे.