सरकारने दहशतवादी घोषित केलं, हिटलिस्टवर आलेला गोल्डी बराड़ आहे तरी कोण?

| Updated on: Jan 02, 2024 | 3:14 PM

गोल्डी बराड़ याचे पूर्ण नाव सतविंदरजीत सिंग आहे. त्याचा जन्म पंजाबमधील मुक्तसर येथे 1994 मध्ये झाला. त्याने पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. कॉलेजच्या दिवसांमध्ये गोल्डी बराड़ हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात आला.

सरकारने दहशतवादी घोषित केलं, हिटलिस्टवर आलेला गोल्डी बराड़ आहे तरी कोण?
Gangster Goldie Brar
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 1 जानेवारी 2024 : केंद्रीय गृहमंत्रालयाने कॅनडामध्ये राहणारा गँगस्टर गोल्डी बराड़ याला दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात सतविंदर सिंग उर्फ ​​सतींदरजीत सिंग उर्फ ​​गोल्डी बराड़ हा बब्बर खालसा दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. गँगस्टर गोल्डी बराड़ हा दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा सरकारचा विश्वास आहे. या कारणास्तव त्याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले असे या निवेदनात म्हटले आहे.

गोल्डी बराड़ आहे तरी कोण?

गोल्डी बराड़ याचे पूर्ण नाव सतविंदरजीत सिंग आहे. त्याचा जन्म पंजाबमधील मुक्तसर येथे 1994 मध्ये झाला. त्याने पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. कॉलेजच्या दिवसांमध्ये गोल्डी बराड़ हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात आला आणि लवकरच तो त्याचा उजवा हात बनला. 2022 मध्ये पंजाबमधील एका विद्यार्थी नेत्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याने सिद्धू मूसवाला यांची हत्या केली. कॅनडामध्ये बसून त्याने ही हत्या घडवून आणली असा त्याच्यावर आरोप आहे.

गोल्डी बराड़ हा अनेक हत्या, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि कट्टरपंथी विचारसरणीचा प्रचार यात सहभागी आहे. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न आणि खंडणीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. दिल्ली-एनसीआर ते पंजाबपर्यंत सुरू असलेल्या टोळीयुद्धाचा मुख्य सूत्रधार तसेच कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा जवळचा सहकारी मानला जातो. कॅनडात बसून तो टोळी चालवत आहे.

पोलिसांपासून वाचण्यासाठी गोल्डी बराड़ 2017 मध्ये भारतातून कॅनडाला गेला. येथूनच तो लॉरेन्सची टोळी चालवत आहे. तपास यंत्रणांच्या मते, यापूर्वी गोल्डीचा चुलत भाऊ गुरलाल बराड़ हा लॉरेन्सचा उजवा हात होता. ऑक्टोबर 2020 मध्ये चंदीगडच्या औद्योगिक परिसरात गुरलालची हत्या करण्यात आली होती आणि त्याची जागा गोल्डी बराड़ याने घेतली.

चुलत भाऊ गुरलाल बराड़ याच्या हत्येनंतर गोल्डी बराड़ याला सूड उगवण्याचा ध्यास लागला. त्याला आपल्या भावाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता. त्यामुळे तो लॉरेन्स बिश्नोईच्या जवळ आला. भाऊ गुरलाल बराड़ यांच्या हत्येतील आरोपीचा त्याने खून केला. या हत्येनंतर पोलिसांची नजर त्याच्याकडे वळली. त्यामुळे तो कॅनडाला पळून गेला होता. कॅनडामधून तो विरोधकांवर हल्ले करणे आणि पैसे उकळण्याचे आदेश देणे अशा गुन्हेगारी कारवाया करत आहे.