श्रीनगर : जम्मू-काश्मीरची (Jammu and Kashmir) राजधानी श्रीनगरमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एक जम्मू-काश्मीर पोलीस हवालदार आणि त्याच्या मुलीला गोळ्या घालण्यात आल्या. गोळीबारात गंभीर जखमी झालेला जवानाला विरमरण आले, तर त्यांची मुलगी जखमी झाली आहे. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर जिल्ह्यातील सौरा भागात हा दहशतवादी हल्ला (terrorist attack) झाला. सैफुल्लाह कादरी असे या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसाचे नाव आहे. तो श्रीनगरमधील मलिक साब परिसरातील रहिवासी होता. तर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (former chief minister Omar Abdullah) यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले, ‘जम्मू-काश्मीर पोलिसांचे कॉन्स्टेबल सैफुल्लाह कादरी यांच्यावरील हल्ल्याचा मी निषेध करतो. भ्याड हल्लेखोरांनी केवळ हवालदाराची हत्या केली नाही, तर त्याच्या 7 वर्षांच्या मुलीलाही जखमी केले. माझ्या माहितीनुसार, ती मुलगी सध्या धोक्याबाहेर आहे.
The injured police personnel succumbed to his injuries and attained martyrdom. We pay our rich tributes to the martyr and standby the family at this critical juncture. @JmuKmrPolice https://t.co/SevScP0shI
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) May 24, 2022
12 मे रोजी बडगाममध्ये काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. बडगाम जिल्ह्यातील चदूरा तहसीलमध्ये महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेला राहुल त्याच्या कार्यालयात उपस्थित असताना दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणली. या घटनेनंतर संपूर्ण काश्मीरमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर काश्मिरी पंडितांनी त्यांचे कामाचे ठिकाण काश्मीरमधून जम्मूमध्ये हलवावे, अशी मागणी सरकारकडे केली होती. राहुल भट्ट यांच्या हत्येविरोधात अनेक दिवस काश्मिरी पंडित रस्त्यावर उतरले होते.
दरम्यान दहशतवाद्यांनी 2 दिवसांपूर्वी 22 मे रोजी अमरनाथ यात्रेला धमकी दिली होती. द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेने धमकीचे पत्र जारी केले होते. या पत्रात दहशतवादी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य करण्यात आले आहे. ते यात्रेच्या विरोधात नाहीत, मात्र जोपर्यंत काश्मीर प्रश्नात सहभागी होत नाहीत तोपर्यंत यात्रेकरू सुरक्षित आहेत, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
30 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होत असून ती 11 ऑगस्टला संपणार आहे. तर 43 दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेतील यात्रेकरूंची संख्या पूर्वीपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. या वेळी रामबन आणि चंदनवाडीत शिबिरे मोठी असतील. या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. यात्रेकरूंचा मागोवा घेण्यासाठी बार-कोड प्रणाली आणि सॅटेलाइट ट्रॅकर्ससह RFID टॅगचा वापर केला जात आहे. प्रवासाचे मार्ग आणि शिबिराच्या ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याशिवाय काश्मीरमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी CRPF च्या 50 अतिरिक्त कंपन्यांना सामील करण्यात आले आहे.