नवी दिल्ली | 25 ऑक्टोबर 2023 : देशाचे नाव बदलण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. जागतिक मंचावर भारताची ओळख, India अशी आहे. तर काही देश भारताला हिंदुस्थान या नावाने ओळखतात. G-20 परिषदेवेळी भारताच्या राष्ट्रपतींनी पाठविलेल्या निमंत्रण पत्रिकेवर President of India ऐवजी President of Bharat असे लिहिले होते. त्यावरुन बराच गदारोळ झाला. देशातील जनतेने केंद्र सरकारचे कौतुक केले. आता NCERT च्या पुस्तकात पण हा बदल दिसणार आहे. इंडिया ऐवजी भारत या शब्दाचा प्रयोग करण्यात येणार आहे. देशाचे नाव आता पाठ्यपुस्तकात India ऐवजी Bharat असे लिहिले जाईल. या इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या नवीन पाठ्यपुस्तकात हा बदल पहिल्यांदा समोर येईल.
या इयत्तेपासून बदल
इंडिया ऐवजी भारत असा बदल करण्यास NCERT च्या पॅनलने मंजूरी दिली आहे. एनसीईआरटीच्या इयत्ता 12 वीच्या पाठ्यपुस्तकात हा बदल करण्यात येईल. नवीन पाठ्यपुस्तकात देशाचे नाव भारत ठेवण्याविषयीचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्याला मंजूरी देण्यात आल्याची माहिती पाठ्यमंडळाचे संचालक सी आय इसाक (CI Issac) यांनी दिली. या पुस्तक समितीने देशाचा प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकण्याची शिफारस सुद्धा केली आहे.
इतिहासाच्या पुस्तकात बदल
एनसीईआरटी समितीने पाठ्यक्रमात हिंदू विजयावर प्रकाश टाकण्याची शिफारस केली आहे. प्राचीन इतिहासाऐवजी शास्त्रीय इतिहासाचा समावेश करण्याची शिफारस त्यासाठी करण्यात आली आहे. 2020 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारण्यात आले. त्यानुसार, हा बदल करण्यात येत आहे. त्यात यापूर्वी पाठ्यपुस्तकात समावेश न केलेल्या ऐतिहासिक इतिहासाचा समावेश करण्यात येईल.
यावर्षी झाला होता बदल
एप्रिल पमहिन्यात एनसीईआरटीने इयत्ता 10वी, 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमात बदल केला होता. या पुस्तकात अनेक धडे हटविण्यात आले होते. नवीन पाठ, धडे जोडण्यात आले आहेत. या बदलांना अर्थातच विरोध होत आहे. विज्ञानाच्या पुस्तकातून अनेक धडे हटविण्यात आले आहे. अनेक वैज्ञानिक, विज्ञान शिक्षक आणि इतर शिक्षकांनी CBSE च्या इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील या बदलांवर नाराजी जाहीर केली आहे.
राष्ट्रपती यांनी केली सुरुवात
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-20 पाहुण्यांसाठी रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण पाठवले होते. त्यात प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला होता. देशातील नावात बदल होत असल्याची चर्चा 2020 पासून सुरु आहे. पण सध्याच्या काही बदलांमुळे या चर्चांना हवा मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मुद्यांवर विरोधकांची विकेट काढली. सप्टेंबर महिन्यात त्यांनी ‘भारत’ अशी लिहिलेली पाटी समोर ठेवली होती. दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत मंडपममध्ये जी20 लीडर्स शिखर सम्मेलन हाच प्रयोग करण्यात आला होता.