यंदा 60 नवीन वंदेभारत एक्सप्रेस धावणार, पाहा तुमच्या शहराचे नाव आहे का ?

| Updated on: Jan 18, 2024 | 7:34 PM

देशात सध्या 34 मार्गांवर वंदेभारत एक्सप्रेस सुरु आहेत. या वर्षी 60 नवीन वंदेभारत एक्सप्रेस सुरु करण्याची रेल्वेची योजना आहे. उत्तरेकडील राज्यात 34 तर दक्षिणेकडील राज्यात 25 वंदेभारत सुरु करण्याची सरकारची योजना आहे.

यंदा 60 नवीन वंदेभारत एक्सप्रेस धावणार, पाहा तुमच्या शहराचे नाव आहे का ?
vande bharat express
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 18 जानेवारी 2024 : देशाची पहिली सेमी हायस्पीड रेल्वे वंदेभारत एक्सप्रेसच्या आगमनाने रेल्वे प्रवासाचे सारे आयामच बदलले आहेत. रेल्वे प्रवास आरामदाय आणि वेगवान होत आहे. इंजिनलेस असलेल्या या वंदेभारत एक्सप्रेसमुळे राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसच्या तुलनेत वेळीची खूपच बचत होत आहे. देशातील विविध राज्यातून साल 2023 मध्ये जवळपास 34 वंदेभारत सुरु झाल्या आहेत. आता यावर्षी देशातील वेगवेगळ्या राज्यातून 60 नवीन वंदेभारत एक्सप्रेस सुरु होणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. या ट्रेनमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांचा देखील फायदा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच अयोध्येतून मुंबई जालना याच्या सह एकूण सहा वंदेभारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखविला. वंदेभारत एक्सप्रेसचा वेग दर ताशी 160 ते 180 किमी इतका आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होत आहे. या ट्रेनमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा, स्वयंचलित दरवाजे आणि आरामदायी आसने तसेच प्रकाशव्यवस्था आहे. मिडीयातील बातमीनूसार आता यंदा 60 नवीन वंदेभारत चालविण्याची योजना आहे. या वर्ष अखेर या ट्रेन टप्प्या टप्प्याने दाखल करण्याची योजना तयार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनूसार कर्नाटक, युपी, महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू, केरळ राज्यातील सरकारांनी केंद्राकडे मागणी केली आहे. तसेच काही केंद्र शासित प्रदेशातून देखील वंदेभारत चालविण्याची मागणी होत आहे. भारतीय रेल्वेची या वर्षीच्या जून महिन्यापर्यंत 18 नवीन मार्गांवर वंदेभारत चालविण्याची योजना आहे.

मुंबई आणि पुण्याला मिळणार वंदेभारत….

वंदेभारतच्या नवीन मार्गांची निवड राज्य सरकार, भारतीय रेल्वे आणि स्वतंत्र सल्लागारांमध्ये झालेल्या चर्चेनंतर केस स्टडीजच्या आधारे केली जाते. संपूर्ण चर्चे अंती रेल्वे बोर्डाची मंजूरी मिळते. त्यानंतरच नवीन मार्गाची निवड केली जाते. रेल्वेने आतापर्यंत 35 मार्ग शोधले आहेत. त्यावरुन या ट्रेन सुरु करण्याची योजना आहे. या 34 वंदेभारत एक्सप्रेस उत्तरेकडील राज्यात आणि 25 वंदेभारत एक्सप्रेस दक्षिणेकडील राज्यात चालविण्याची योजना आहे. मुंबई ते शेगांव, पुणे ते शेगांव, बेळगाव ते पुणे, रायपूर ते वाराणसी आणि कोलकाता ते राउरकेला मार्गावर या ट्रेन सुरु होणार आहेत. गुजरातलाही नवीन वंदेभारत एक्सप्रेस मिळणार असून बडोदा ते पुणे दरम्यान ही ट्रेन सुरु करण्याची योजना आहे.