झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील सिसाई ब्लॉकच्या जत्राटोली येथे राहणारे बिरसा ओराव यांनी पत्नी मीला ओराव यांना पत्र पाठविले. जून महिन्यात हे पत्र त्यांना मिळाले होते. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये मी घरी येत आहे असे त्यांनी पत्रातून कळविले होते. पूर्ण वर्ष उलटले. पण, बिरसा ओराव काही घरी आला नाही. त्यांची सहा वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगाही वडिलांची वाट पाहत होता. ते घरी येण्याच्या प्रतीक्षेत होते. पण, त्यांची ही प्रतीक्षा कधीही न संपणाऱ्या प्रतिक्षेत बदलली. बिरसा ओराव अखेरपर्यंत घरी आलेच नाही. ते घरी आले ते भारतीय तिरंग्यात गुंडाळून. 1999 साली भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या बिहार रेजिमेंटचे हवालदार बिरसा ओराव यांची ही कहाणी…
कारगिल युद्धात भारताचे 527 शूर जवान शहीद झाले. युद्धाच्या दोन महिने आधीच हवालदार बिरसा ओराव यांनी पत्नी मीला ओराव यांना पत्र लिहिले. त्यावेळी त्या गावी राहत होत्या. फोनची सुविधा नाही. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी पत्र किंवा टेलिग्रामवर अवलंबून राहावे लागत असे. अशातच 1998 च्या जून महिन्यात त्यांचे पत्र आल्याने पत्नीला आनंद झाला. पण, इकडे कारगिल युद्ध सुरु झाले आणि बिरसा ओराव युद्धासाठी गेले.
अचानक एके दिवशी बातमी आली की त्यांचे पार्थिव सिसाई येथे आणले जात आहे. मीला ओराव यांना ही बातमी ऐकून मोठा धक्का बसला. काय करावे ते त्यांना समजत नव्हते. ते स्वतः येईन असे म्हणाले होते. पण, ते आले नाही. तिरंग्यात गुंडाळलेला त्यांचा मृतदेह पाहून त्यांची इतक्या दिवसांची प्रतीक्षा संपूनच गेली. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचे पतींचे, मुलाचे, मुलगीची इच्छा तशीच राहिली.
शहीद बिरसा ओराव यांच्या मनात देशप्रेमाची भावना इतकी होती की त्यांनी कारगिल युद्धच लढले नाही तर सैन्याच्या विविध ऑपरेशन्समध्येही आपले शौर्य दाखवले. ऑपरेशन ऑर्चर्ड नागलाड, ऑपरेशन रक्षक पंजाब, यूएनओ सोमालिया ते दक्षिण आफ्रिका, ऑपरेशन राइनो आसाम यांसारख्या ऑपरेशनमध्ये त्यांचा सहभाग होता.
शहीद बिरसा ओराव हे बिहार रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. आधी ते जवान, नंतर लान्स नाईक आणि पुढे हवालदार झाले. त्यांना सहा पुरस्कार मिळाले ज्यामध्ये नागालँडचे सामान्य सेवा पदक, भारत सरकारचे नऊ वर्षांचे दीर्घ सेवा पदक, सैनिक सुरक्षा पदक, युनायटेड नेशन्सचे ओव्हरसीज मेडल, पहिल्या बिहार रेजिमेंटच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्य पदक आणि भारत सरकारकडून मरणोत्तर विशेष सेवा पदक यांचा समावेश आहे. वडिलांपासून प्रेरणा घेऊन त्यांची मुलगी पूजा विभूती ओराव पोलीस सेवेत रुजू झाली आहे. ती ही देशाची सेवा करत आहे.