उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या भूमीवर अनेक चमत्कारांनी भरलेली मंदिरे आहेत. यापैकीच एक म्हणजे लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तेल नगरातील नर्मदेश्वर महादेव मंदिर. सुमारे 200 वर्षापुर्वीचे हे शिवमंदिर आहे. राजस्थानी स्थापत्य कलेने आणि मंडुक तंत्रानुसार बनवलेले हे एकमेव मंदिर आहे. या शिवमंदिराला बेडूक मंदिर (फ्रॉग टेंपल) असे म्हटले जाते. जगातील हे एकमेव असे बेडूक मंदिर आहे जिथे भगवान शिव बेडकाच्या पाठीवर बसले आहेत. त्यामुळेच या मंदिरात भगवान शंकरासोबत बेडकाचीही पूजा केली जाते.
19 व्या शतकात चाहमना घराण्यातील राजा बक्श सिंह यांनी हे मंदिर बांधले. चाहमना घराणे हे त्या काळात शैव पंथाचे मुख्य केंद्र होते आणि येथील राज्यकर्ते शिवाचे उपासक होते. राजा बक्श सिंह यांनी हे मंदिर बांधताना कपिला नावाच्या एका शैव पंथातील तांत्रिकाचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसारच तांत्रिक पद्धतीने विधीवत मंडुक तंत्रशास्त्रानुसार हे मंदिर निर्माण केले गेले.
स्थापत्य रचनेच्या खास शैलीमुळे हे मंदिर मनमोहक आहे. संपूर्ण मंदिर बेडकाच्या पाठीवर उभे केले आहे. तर याची स्थापत्य रचना ही एखाद्या विशिष्ट यंत्राप्रमाणे अष्टकोनी आकारात आहे. बेडूक मंदिरामध्ये एक विहीर आहे. त्या विहीरीला बाराही महिने पाणी असते. ही विहीर कधीच कोरडी पडत नाही.
भगवान शिव शंकर यांचे देशातील हे एकमेव असे मंदिर आहे की, जिथे नंदीची उभी मुर्ती आहे. हा प्रकार इतरत्र कुठेही दिसत नाही. नर्मदेश्वर महादेव अशीही या मंदिराची ओळख आहे. कारण, या मंदिरातील शिवलिंग हे नर्मदा नदीतून आणलेल्या शिल्पातून बनविण्यात आले आहे अशी माहिती सांगितली जाते. मंदिरात शिवासोबत बेडकांचीही पूजा केली जाते. मंदिरातील शिवलिंगाचा रंग सातत्याने बदलतो. त्यामुळे या मंदिराची ख्याती सर्वत्र पसरली आहे. महाशिवरात्री तसेच दिवाळीनिमित्त येथे भाविकांची मोठी गर्दी होते.
मंदिराच्या आत अनेक चित्रे लावली आहेत. त्यामुळे मंदिर आणखी भव्य दिसते. अशी दुर्मिळ छायाचित्रे जगात कुठेही पाहायला मिळत नाहीत, असेही म्हटले जाते. भगवान शिव यांचा पवित्र पॅगोडा येथे आहे. हा पॅगोडा चौकोनी आकारात घुमटासह बांधलेला आहे. असे सांगितले जाते की मंदिराचे छत पूर्वी सूर्यप्रकाशाने फिरत असे. पण, सध्या ते खराब झाले आहे,