जयपूर | 3 फेब्रुवारी 2024 : राजस्थानमध्ये एक गाव आहे. हा गावच्या वेशी संध्याकाळी 6 वाजता बंद होतात. राज्य सरकारने या गावात संध्याकाळी बंदी असणारे फलक लावले आहेत. शिवाय गावात संध्याकाळी कुणी प्रवेश करू नये म्हणून एक भले मोठे गेटही लावले आहे. रात्रभर हे गेट बंद असते, ते सकाळीच उघडले जाते. रात्री या गावात कुणालाही प्रवेश नाही. यातूनही कुणाला स्वतःच्या जबाबदारीवर गावात रात्री रहायचे असेल तर सरकारकडे अर्ज करून लेखी परवानगी घ्यावी लागते. या गावात रात्री राहिल्यास जीवाला धोका आहे म्हणूनच राज्य सरकारने ही विशेष बंदी घातली आहे.
राजस्थान राज्यातील जैसलमेर जिल्ह्यात हे रहस्यमयी गाव आहे. कुलधारा हे त्याचे खरे नाव पण ते भुतांचे गाव म्हणून प्रख्यात आहे. या गावात रात्री भूत, आत्मे, वाईट शक्ती येतात असे म्हणतात. या गावात अंदाजे 600 घरे आहेत. काही घरे पडलेल्या अवस्थेत आहेत तर काही घरे अजूनही चांगली आहेत. परंतु, ती घरे पूर्णपणे रिकामी आहेत.
कुलधारा गावातील घरांमधील चुलीमध्ये असलेली राख वर्षानुवर्षे जशीच्या तशी आहे. घरत काही ठिकाणी अनेक वस्तू तशाच पडून आहेत. पण इथे कोणीही राहात नाही. या गावात राहणाऱ्या पूर्वजांनी असा शाप दिला आहे की इथे जो कोणी राहील तो बरबाद होईल. इथे जो राहील त्याचा सत्यानाश होतो अशी आख्यायिका आहे.
भूत, आत्मे, वाईट शक्ती या विषयाचे संशोधन करणारी एक टीम तेथे रात्रभ्र राहिली होती. अंधारात फोटो घेणारे कॅमेरे, सूक्ष्म हालचाल टिपणारी यंत्रे, अत्यंत सूक्ष्म ध्वनी टिपणारी मशीन वगैरे बरीच मशीन त्यांनी सोबत नेल्या होत्या. ही टीम तेथे रात्रभर राहिली. पण, त्यांना कोणी नजरेस पडले नाही. मात्र, त्या मशीन्सवर अनेक लोकांची चाहूल लागल्याची नोंद झाली आहे.
१३ व्या शतकामध्ये पालीवाल ब्राह्मणांनी हे गाव बांधले. त्यांचा मुख्य धंदा शेती आणि पशुपालन होत. हे सर्व श्रीमंत होते. त्या राज्याचे राजे गावातून दर महा जकात किंवा कर गोळा करत. या कामासाठी त्यांनी मुनीम ठेवले होते. गावा गावात जाऊन ते वसुली करत. पण, येथील मुनीम अत्यंत क्रूर आणि वाईट वर्तनाचा होता.
एकदा वसुलीला आला असता त्याची नजर देवळातील पुजाऱ्याच्या मुलीवर पडली. त्याने पुजाऱ्याला रात्री मुलीला त्याच्या महालात पाठवून देण्याचा हुकुम सोडला. पण, पुजाऱ्याला मुलीला पाठवले नाही. मुनीम रागावून गावात आला आणि त्याने सर्व गावाला येत्या पौर्णिमेला मुलीला माझ्याकडे पाठवा नाही तर संपूर्ण गाव उध्वस्त करीन अशी धमकी दिली.
मुनीमच्या धमकीमुळे सर्व गावाने मीटिंग घेतली. सैन्यासोबत आपल्याला लढत येणार नाही. मुलगी ही गावाची इज्जत आहे त्यामुळे तिलाही पाठवता येणार नाही. म्हणून गावाने एकत्रित गाव सोडण्याचा निर्णय घेतला. एकूण 600 घरे त्या गावात होती. त्याच रात्री सर्वांनी एकजूट दाखवून फक्त आवश्यक आणि मौल्यवान वस्तू घेऊन गावं सोडले. पण, जाताना त्यांनी गावाला शाप दिला की येथे जो कुणी राहिल त्याचा सत्यानाश होईल. ही दंतकथा आजही प्रचलित आहे. त्यामुळे आजही येथील घरे रिकामी आहेत.