नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2023 : उत्तर भारतावर निसर्ग कोपला आहे. मुसळधार पावसाने उत्तर भारतात हाहाकार माजवला. हिमाचल प्रदेशासह उत्तराखंडमध्ये भूस्खलनाचे प्रकार घडले. त्यात मानवी हानी झाली. मोठे नुकसान झाले. असाच प्रकार आता सिक्कीम राज्यात (Sikkim Floods) दिसून येत आहे. या राज्यावर निसर्ग कोपला आहे. या आपत्तीत आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू ओढावला आहे. त्यात 7 जवानांचा समावेश आहे. तर 100 जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यात 15 लष्करातील जवानांचा समावेश आहे. राज्य सरकारने 2500 नागरिकांची सुटका केली आहे तर 6000 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग (CM Prem Sing Tamang) यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे आरोपांचा महापूर ओढावला आहे.
या कारणामुळे आला महापूर
धरणाच्या निकृष्ट बांधकामामुळे ही आपत्ती ओढावल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या सरकारच्या काळात चुंगथांग धरणाचे निकृष्ट बांधकाम झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला. दक्षिण ल्होनाक धरणाचा 1200 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प यामुळे वाहून गेल्याचा आरोप त्यांनी केला. हिमनदी सरोवर फुटल्यानंतर अचानक पूर आला. त्यात दक्षिण ल्होनाक धरणाचा जलविद्युत प्रकल्प वाहून गेल्याचा ठपका त्यांनी ठेवला.
धरणच गेले वाहून
तमांग यांनी NDTV ला बोलताना हा ठपका ठेवला. सिक्कीममध्ये यापूर्वी 24 वर्षांहून अधिक काळ डेमोक्रॅटिक फ्रंट सरकार सत्तेत होते. या निकृष्ट बांधकामामुळेच Lhonak Lake वाहून गेला. पूर थोपविण्यात हे धरण कमी पडले. त्यामुळे खालच्या भागात महापूराने थैमान घातले. त्यात 19 लोकांचा मृत्यू ओढावल्याचा आरोप त्यांनी केला.
मोठे नुकसान
Chunthang Dam परिसरात सर्वाधिक फटका बसला आहे. या धरणाचे जास्त नुकसान झाले. धरणाखालील क्षेत्रात सर्वाधिक नुकसान झाले. या भागात अनेक रस्ते वाहून गेले. अनेक छोटे-मोठे पूल वाहून गेले. या भागातील 13 पूल तर गायब झाले आहेत. या भागात नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत आहे. पर्यटकांना सुरक्षित स्थळी पोहचवणे हे सर्वात महत्वाचे काम असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या 3,000 पर्यटक अडकलेले आहेत. त्यांची सूटका करण्यात येत आहे.