नवी दिल्ली : तर ही कथा आहे 1975 मधली. या काळात दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत होत्या. राजकीय वादंग पेटले होते. विरोधक आणि सत्ताधारी यांचं कोण भांडण टोकाला गेलं होते. भारतात आणीबाणी लागू करण्यात आली होती आणि याच काळात दिल्लीत एक प्रेमकथा (A Love Story) फुल्लत होती. पोर्ट्रेट कलाकार प्रद्युम्न कुमार महानंदिया (Pradyumna Kumar Mahanandia) हे या या प्रेमकथेतील नायक आहे तर स्वीडनची चार्लोट वॉन शेडविन (Charlotte Von Schedvin) या त्यांची प्रेयसी आहेत. महानंदिया हे सुविख्यात कलाकार, त्यांची चित्र गाजत होती. शेडविन आणि त्यांची भेट या चित्रकारीतूनच झाली. त्यांना शेडविनच्या सौंदर्याने भूरळ घातली तर शेडविन यांना महानंदिया यांच्या साधेपणानं.. पण पुढे जे झालं ते एखाद्या चित्रपटाला शोभेल असंच होतं.
चुंबकच जणू
प्रद्युम्न यांनी या भेटीविषयी लिहलं आहे. तिला पाहतच मी चुंबकासारखा तिच्याकडे आकर्षित झालो. तिच्या पण तशाच भावना होत्या. प्रेमातील ओढं दोघांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी लागलीच लग्नाचा निर्णय घेतला. चार्लोट यांनी भारतीय साडी घातली आणि महानंदिया यांच्या वडिलांची परवानगी घेतली. आदिवासी परंपरेप्रमाणे थाटात लग्न झाले. नियमाप्रमाणे एक वर्ष शिक्षणानंतर चार्लोट यांना स्वीडन यांच्या मुळ देशात जावे लागले.
मन स्वस्थ बसू देईना
नववधू भारतात फार काळ नांदलीच नाही. चार्लोट स्वीडनला गेल्यावर पत्रातून प्रेम फुलत होतं. पण चार्लोट यांना भेटण्याची ओढ महानंदिया यांना स्वस्त बसू देत नव्हती. कोणत्याही परिस्थितीत पत्नीला भेटण्याचे त्यांनी निश्चित केले. विमानाचे तिकिट खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग त्यांच्याकडे जे होते, ते सर्व विकून त्यांनी एक मोठं पाऊलं टाकलं.
असा केला सायकलचा प्रवास
सर्वच ओढताणीवर पत्नीला भेटण्याची ओढ, प्रभावी ठरली. महानंदिया यांनी 22 जानेवारी 1977 रोजी स्वीडनला जाण्यासाठी प्रवास सुरु केला. त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा पाकिस्तानची सीमारेषा ओलांडली, त्यानंतर अफगाणिस्तान असा हा प्रवास सुरू होता. सायकलने ते दररोज 70 किलोमीटरचे अंतर कापत होते. चार महिन्यानंतर ते स्वीडनला पोहचले. यादरम्यान त्यांची सायकल अनेकदा तुटली आणि अन्नपाण्यावाचूनही त्यांना काही दिवस काढावे लागले. 28 मे 1977 रोजी ते स्वीडनला पोहचले.
आता येणार चित्रपट
आता या दोघांची मुलं या उत्कट प्रेम कथेवर एक चित्रपट काढण्याच्या बेतात आहेत. त्यासाठी त्यांनी कथा, पटकथेवर काम पण सुरु केले आहे. त्यांनी कथेचा काही भाग हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांना ऐकविला. सध्या ही प्रेमकथा इंटरनेटवर पुन्हा व्हायरल झालं आहे.