मोठा निर्णय! हायकोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टाने ज्ञानवापी मशिदीच्या एएसआय सर्व्हेबाबत सांगितलं असं काही…

| Updated on: Aug 04, 2023 | 4:43 PM

जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयानंतर आता ज्ञानवापी मशिद एएसआय सर्व्हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे एएसआय सर्व्हेबाबत काय होणार ते जाणून घ्या..

मोठा निर्णय! हायकोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टाने ज्ञानवापी मशिदीच्या एएसआय सर्व्हेबाबत सांगितलं असं काही...
Gyanvapi : ज्ञानवापी मशिदीच्या एएसआय सर्व्हेबाबत सुप्रीम कोर्टाने दिला असा निर्णय, आता...
Follow us on

नवी दिल्ली : वाराणसीतील ज्ञानवापी परिसरात होत असलेल्या एएसआय सर्व्हे थांबवण्यासाठी मुस्लिम पक्षाच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाकडून मुस्लिम पक्षाला कोणताच दिलासा मिळालेला नाही. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाने आपल्या निर्णयात एएसआय सर्व्हेतून खरं काय ते समोर येईल असं सांगितलं आहे. यापूर्वी हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाने दिलेला एएसआय सर्व्हेचा निर्णय कायम ठेवला होता. त्यामुळे मुस्लिम पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र आता एएसआय सर्व्हे कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होणार आहे.

काय म्हणालं सुप्रीम कोर्ट?

सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की, “एएसआयने सर्व्हे करताना कोणत्याही स्थानाचं नुकसान होणार याचं आश्वासन दिलं आहे. सर्व्हेतून खरं काय ते समोर येईल. प्रत्येक प्रक्रियेला आव्हान दिलं जाऊ शकत नाही. एएसआय सर्व्हे अहवाल सीलबंद ठेवण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. ” सुप्रीम कोर्टाने आपल्या सुनावणीत सांगितलं की, आमचा अयोध्येचा निकाल एकदा बघा. सर्व्हेतून काही साक्ष समोर येतात. राम मंदिर प्रकरणात यावर चर्चा झाली होती. त्यामुळे प्रत्येक स्तरावर आव्हान देणं योग्य नाही.

मुस्लिम पक्षाने सांगितलं की, “सर्व्हेच्या माध्यमातून ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्टचं उल्लंघन होईल. ” सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुनावणी दरम्यान सांगितलं की, सर्व्हेत जीपीआर टेक्नोलॉजीचा वापर केला जाईल. यात इमारतीचं कोणतंही नुकसान होणार नाही. दुसरीकडे, ज्ञानवापी एएसआय सर्व्हेचा आजचं काम पूर्ण झालं आहे. या सर्व्हेचं डॉक्युमेंटेशन केलं जात आहे.

पुढच्या आठवड्यात श्रृंगार गौरी प्रकरणाची सुनावणी

या सुनावणी दरम्यान मुस्लिम पक्षाचे वकील हुजैफा अहमदी यांनी सांगितलं की, आम्ही कनिष्ठ न्यायालयात चाललेली सुनावणी रोखण्याची मागणी केली आहे. शृंगार गौरी पुजेची मागणी करणारी याचिका योग्य असलेल्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.