भारतीय रेल्वेच्या ( Indian Railway ) बाबतीत नेहमीच ट्रेन उशीरा धावतात ही प्रवाशांची तक्रार नेहमीच असते. कधी ट्रेन धुक्यामुळे लेट होते. तर कधी ट्रेन मेगा ब्लॉकमुळे अडकते. कधी-कधी ट्रेन दोन दिवस लेट झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता तर देशातील पहिली खाजगी ट्रेन मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस लेट झाल्यास आयआरसीटीसी ( IRCTC ) चक्क नुकसान भरपाई देते. परंतू आता भारतीय रेल्वे प्रशासनाची झोप एका गोष्टीमुळे उडाली आहे. येथे एका ट्रेनच्या लोको पायलट आणि पायलट जास्त वेगाने ट्रेन चालविणे चांगलेच महागात पडले आहे. रेल्वेने गतिमान एक्सप्रेस ( Gatiman Express ) आणि मालवा एक्सप्रेस ( Malwa Express ) यांच्या पायलट आणि सहायक पायलटना या कारणांमुळे निलंबित करण्यात आले आहे.
वास्तविक या रेल्वे मार्गांवर ट्रेनच्या वेगावर निर्बंध लावण्यात आले होते. प्रति तास 20 किमी वेगाने ट्रेन चालविण्याचे आदेश होते. परंतू या ट्रेन प्रति तास 120 किमी वेगाने चालविण्यात आल्याचे उघडकीस आले. हा प्रकार अलिकडेच आग्रा कॅंट जवळ जाजौ आणि मनिया रेल्वे स्थानकांच्या दरम्यान घडला. येथील पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यामुळे ट्रेनच्या वेगांवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे रेल्वे प्रति तास 20 किमी वेगाचे बंधन घातले होते.
या घटनेत दोषी आढळलेल्या सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे आग्रा मंडळाचे जनसंपर्क अधिकारी प्रशस्ती श्रीवास्तव यांनी सांगितले. सर्व कर्मचाऱ्यांवर शिस्तपालन न केल्याने कारवाई होणार आहे. पहिल्या घटनेत गतिमान एक्सप्रेसबाबत घडली आहे. गतिमान एक्सप्रेसच्या पायलटनी ट्रेन आग्रा कॅंटहून ग्वाल्हेरला रवाना झाल्यानंतर ठरलेल्या वेग निर्बंधाचे उल्लंघन केल्याचा
ठपका ठेवण्यात आला आहे. गतिमान एक्सप्रेस देशाची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ती दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन आणि उत्तर प्रदेशातील वीरांगणा लक्ष्मीबाई झॉंशी जंक्शन दरम्यान दर ताशी 160 किमीच्या वेगाने धावते.
गतिमान एक्सप्रेसच्या घटनेनंतर काही दिवसांनी कटरा ( जम्मू ) आणि इंदोर ( मध्य प्रदेश ) दरम्यान धावणारी अन्य एक ट्रेन मालवा एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने देखील वेग निर्बंधाचे उल्लंघन केले आहे. आणि ट्रेनला दर ताशी 120 किमी वेगाने चालविण्याची चूक केली. वास्तविक संबंधित सेक्शनला ट्रेनना दर ताशी 120 किमी वेगाने चालविण्याची अनुमती आहे. परंतू नदी पुलाच्या दुरुस्तीच्या कामांमुळे येथे वेगावर निर्बंध लादण्यात आले होते. त्यांनी दर ताशी 20 किमी वेगाने ट्रेन चालविणे अपेक्षित होते. संबंधित सेक्शनला वेगावर निर्बंध घातल्याचे ट्रेनचे ड्रायव्हर विसरले आणि त्यांनी ट्रेनचा वेग कमी केला नाही. ही एक भयंकर चूक आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना निलंबनाची शिक्षा करण्यात आल्याची माहीती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.
अनेक कारणांमुळे रेल्वे रुळांच्या स्थितीमुळे, दुरुस्तीमुळे आणि रेल्वे पुल तसेच स्टेशन यार्ड रिमॉडलिंग अशा अनेक कारणांमुळे ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन वेगांवर निर्बंध लादत असते. जेव्हा पायलट आणि लोको पायलट ट्रेनचा ताबा घेतात, तेव्हा त्यांना मार्गांवरील सर्व परिस्थिती, सिग्नल, वेग निर्बंध, याचा संपूर्ण चार्ट पुरविलेला असतो. तसेच स्टेशन मास्तरही पायलटच्या संपर्कात असतात. त्यानूसार त्यांना प्रत्येक सेक्शनमधील वेग निर्बंधाची काळजी घेऊन वेग कमी जास्त करावा लागतो. यातील एकही चूक मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकते अशी माहीती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.