ओडिशातील प्राचीन भगवान जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार रविवारी म्हणजेच 14 जुलै रोजी 46 वर्षांनंतर उघडण्यात आले. दार उघडण्याचा शुभ मुहूर्त 1:28 वाजता निश्चित करण्यात आला होता. 1978 मध्ये शेवटचे रत्न भंडार उघडण्यात आले होते. त्यावेळी एकूण 367 दागिने सापडले होते आणि त्याचे वजन 4,360 तोळे भरले होते. त्यामुळे आता रत्न भांडारात किती खजिना आहे हे समोर येणार आहे. मंदिरातील रत्न भांडार उघडण्यासाठी सकाळपासून तयारी सुरू होती. रत्न भंडार मधील दागिने ठेवण्यासाठी 6 चेस्ट पुरीत पोहोचल्या आहेत. त्या सागवान लाकडापासून बनवलेल्या आहेत. त्यांना आतून धातूचा थर देण्यात आला आहे.
ओडिशातील जगन्नाथ मंदिराचे ‘रत्न भंडार’ उघडण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. न्यायमूर्ती विश्वनाथ रथ हे या समितीचे अध्यक्ष आहेत. रत्न भंडार पुन्हा सुरू करण्यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत रत्न भंडार उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. रत्न भंडार उघडण्याचा आणि त्यामधील दागिन्यांची काळजी घेण्याचा निर्णय यावेळी घेतला गेला. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ‘पुरोहित’ आणि ‘मुक्ती मंडप’ यांच्या सूचनांनुसार रत्न भांडार उघडण्याची वेळ दुपारी 1.28 वाजता निश्चित करण्यात आली.
रत्न भंडारचे दरवाजे उघडण्याच्या निर्णया संदर्भात माहिती देताना समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती विश्वनाथ रथ म्हणाले की, “निर्णयानुसार रत्न भंडार उघडले जाईल. त्यानंतर दोन्ही भांडारांमध्ये ठेवलेले दागिने आणि मौल्यवान वस्तू गर्भगृहाच्या आतमध्ये आधीच वाटप केलेल्या खोल्यांमध्ये नेले जातील. ही प्रक्रिया सुरु असताना त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. मात्र, हे एक मोठे आव्हान आहे. कारण, 46 वर्षांपासून रत्न भंडारचा दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे आतमध्ये काय परिस्थिती आहे हे कोणालाच माहित नाही.
श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे (एसजेटीए) मुख्य प्रशासक अरविंद पाधी यांनी, ‘रत्न भंडारमध्ये समितीच्या सदस्य तसेच समितीने नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त कुणालाच प्रवेश देण्यात येणार नाही. मोजणी पूर्ण होईपर्यंत मंदिरात तात्पुरती प्रवेशबंदी लागू केली जाईल. फक्त सिंहद्वार गेट उघडे राहिल तर इतर सर्व दरवाजे बंद राहतील. येथे सामान्य लोकांना प्रवेश करता येणार नाही. सर्व समिती सदस्यांची सुरक्षा तपासणी केली जाईल आणि संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाईल अशी माहिती दिली.
रत्न भंडार या ऑपरेशनचे पर्यवेक्षण एसजेटीएचे मुख्य प्रशासक अरविंद पाधी करणार आहेत. त्याच्या टीममध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), ASI, रत्न भंडारशी संबंधित सेवक आणि व्यवस्थापनासह उच्चस्तरीय समित्यांचे सदस्य असतील. रत्न भंडार पुन्हा उघडणे हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. जगन्नाथ मंदिर हे चार धामांपैकी एक आहे. 12 व्या शतकात हे मंदिर बांधले गेले. या मंदिरात रत्नांचे भंडारही आहे. रत्न भंडारला देवाचा खजिना म्हणतात. रत्न भंडारात जगन्नाथ मंदिरातील भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा या तिन्ही देवतांचे दागिने ठेवलेले आहेत. अनेक राजे आणि भक्तांनी वेळोवेळी देवांना अर्पण केलेले दागिने या रत्न भंडारात ठेवले आहेत.