मुंबई : (Monsoon Rain) मान्सूनचा पाऊस हा अनिश्चित आणि अनियमित अशाच स्वरुपाचा असतो त्याच प्रमाणे बरसण्याचेही त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मान्सूनचे आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. शिवाय यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. पण मान्सून देशात दाखल होत असताना त्याचे वेगवेगळे रुप माहित असणे गरजेचे आहे. आता भारतामध्ये दाखल होणाऱ्या मान्सूनच्या (Two branches) दोन शाखा आहेत. त्यामुळे आपल्या विभागात कोणत्या शाखेतून म्हणजेच कोणत्या समुद्रातून येणाऱ्या (Wind showers) वाऱ्याच्या सरी बरसतात याची माहिती असणे गरजेचे आहे. भारतामध्ये एक शाखा बंगालच्या उपसागरातून तर दुसरी शाखा अरबी समुद्राकडून येते.
भारतामध्ये मान्सून हा बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून दाखल होतो. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अरबी समुद्राकडून येणारा पाऊस बरसतो तर विदर्भाला पश्चिम बंगालच्या उपसागरातील शाखेचा लाभ होतो. भारतामध्ये मान्सून दाखल होताना तो समप्रमाणातच असतो मात्र, देशांतर्गत येथील भौगोलिक रचनेनुसार पर्जन्यामध्ये फरक जाणवून येतो. त्यामुळेच कुठे अतिवृष्टी तर रिमझिम अशी अवस्था असते. मान्सून वाऱ्यांना जिथे अडथळा निर्माण होतो तेथेच ते अधिक बरसतो.
देशातील पर्वतरांगा ह्या पाऊस दुभागण्याचे काम करतात. महाराष्ट्रातील सह्याद्री आणि पश्चिम घाट हे पावसाला वेगवेगळ्या भागात विभागणी करतात. पर्वत रांगांना बाष्पयुक्त वारे अडल्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस बरसतो तर त्याच वेळी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग हा पर्जन्य छायेत सापडतो त्यामुळे या भागात पावसाचे प्रमाण हे कमी असते. बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या पर्वतरांगाना अडतात आणि घाटमाथा व कोकणात भरपूर पाऊस देतात. मात्र पुढे पश्चिम महाराष्ट्रातील मुख्यत: अहमदनगर, सांगली, सोलापूर जिल्हे आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यात येईपर्यंत या मोसमी वाऱ्यांतील बाष्पाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे या भागाला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात.
मान्सून पावसाची जशी निश्चत वेळ नाही त्याचप्रमाणे तो किती बरसेल याचाही नियम नाही. मान्सून सक्रीय झाला तरी तो सर्व विभागात समप्रमाणात होईल असे नाही. येथील भौगोलिक रचनेप्रमाणे पर्जन्यमान ठरते. भारतामध्ये सर्वसाधारणपणे सरासरी 887.5 मिमी पाऊस पडतो. असे असले तरी कोकण व गोवा उप विभागात सरासरी 2915 मिमी, मध्य महाराष्ट्रात 729 मिमी, मराठवाड्यात 683 मिमी तर विदर्भात 955 मिमी पाऊस पडतो. हे वेगळेपण भौगोलिक रचनेमुळेच आहे.