मुंबई : यंदा देशात वेळेपूर्वी (Monsoon Rain) मान्सून दाखल झाला पण देशभर सक्रिय होण्यासाठी जून महिना उलटावा लागला होता. हंगामाच्या सुरवातीला निसर्गाचा लहरीपणा काय असतो याची प्रचिती राज्यभरातील नागरिकांना आली होती. त्यामुळे (Kharif Sowing) खरीप पेरण्याही लांबणीवर पडल्या होत्या. जून महिन्यात सरासरी सोडा पेरणी एवढाही पाऊस झाला नव्हता. मात्र, जुलैच्या 1 तारखेपासून राज्यात पावसाने अशी काय हजेरी लावली की सर्व चित्रच बदलून गेले. सलग आठ दिवस पावसामध्ये सातत्या राहिल्याने दीड महिन्यातील पाऊस 8 दिवसांमध्येच बरसला आहे. त्यामुळेच सरासरीपेक्षा अधिकचा (Rain Percentage) पाऊस झाल्याची नोंद आहे. शिवाय राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिमझिम पाऊस हा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या 10 दिवसांपासून राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. असे असले तरी आगामी आठवड्याभरात पावसाचे प्रमाण हे कमी-अधिक राहणार आहे. कोकणातील रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे तर नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज आहे. 20 जुलैपर्यंत पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
हंगामाच्या सुरवातीपासूनच कोकण, मुंबईसह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची कृपादृष्टी राहिलेली होती. निसर्गाच्या या लहरीपणामुळे नाशिक आणि नांदेडमध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 300 मिमी पावसाची सरासरी असताना आतापर्यंत 649 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर नांदेड जिल्ह्यामध्ये दीड महिन्यात 654 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 254 मिमी पावसाची सरासरी असताना तिपटीने अधिक पाऊस या जिल्ह्यामध्ये बरसला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. हवामान विभागाने गेल्या दीड महिन्यात झालेल्या पावसाचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यात 92 टक्के, ठाणे 48 टक्के, धुळे 51 टक्के, नाशिक 116 टक्के, सातारा 32, औरंगाबाद 59 टक्के, बीड 86, लातूर 98 टक्के, नांदेड 154, उस्मानाबाद 75, परभणी 87, चंद्रपूर 64, गडचिरोली 66, नागपूर 73 टक्के असा पाऊस बरसला आहे.