Rain : मान्सूनचा लहरीपणा, जूनचा पंधरवाडा ओलांडला तरी कही खुशी..कही गम..! राज्यातले चित्र काय?

| Updated on: Jun 16, 2022 | 11:28 AM

ज्या तळकोकणातून राज्यात पाऊस दाखल होत असतो त्याच भागात सध्या चिंतेचे वातावरण आहे. कारण 10 जून रोजी पावसाला सुरवात झाली तेव्हापासून एकही मुसळधार पाऊस झालेला नाही. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण आणि नंतर कडाक्याचे ऊन यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावऱण आहे.

Rain : मान्सूनचा लहरीपणा, जूनचा पंधरवाडा ओलांडला तरी कही खुशी..कही गम..! राज्यातले चित्र काय?
मान्सून
Follow us on

मुंबई : आतापर्यंत हवामान विभागाच्या अंदाजावर समाधान मानणारा शेतकरी (Monsoon) मान्सूनच्या लहरीपणामुळे चिंतेत आहे. राज्यात उशीरा दाखल झालेला मान्सून अल्पावधीतच सक्रीय होईल असा अंदाज वर्तवला जात होता. पण आता जून महिन्याचा पंधरवाडा उलटलेला आहे. असे असताना ज्या कोकणातून मान्सून (Maharashtra) राज्यात दाखल झाला त्याच भागातील रत्नागिरी जिल्ह्यातून पाऊस गायब झाला आहे. उर्वरीत महाराष्ट्रात अनिश्चित व अनियमित असलेला पाऊस कुठे बरसतो तर कुठे फिरकतही नाही. मान्सूनच्या या रुपामुळे राज्यात (Kharif Season) खरिपाच्या पेरण्या तर खोळंबल्या आहेतच पण पावसाचा अंदाजच बांधता येत नसल्याने खरिपावरच चिंतेचे ढग आहेत. आता पाच दिवस मुसळधार पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण यामध्ये राज्यातील विदर्भ वगळता कोणत्याही भागाचा समावेश नाही. त्यामुळे मान्सून पूर्ण क्षमतेने सक्रीय केव्हा होणार हा प्रश्न कायम आहे.

  1. कोकणवाशीयांनाच पावसाची प्रतीक्षा
    ज्या तळकोकणातून राज्यात पाऊस दाखल होत असतो त्याच भागात सध्या चिंतेचे वातावरण आहे. कारण 10 जून रोजी पावसाला सुरवात झाली तेव्हापासून एकही मुसळधार पाऊस झालेला नाही. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण आणि नंतर कडाक्याचे ऊन यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावऱण आहे. पावसाला सुरवात होताना पोषक वातावरण होते पण आता यामध्ये मोठा बदल झाला आहे.
  2. मराठवाड्यात पोषक वातावरण
    आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत केवळ 6.37 टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवलेली आहे. आतापर्यंत केवळ हिंगोली आणि नांदेडमध्ये पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. मात्र, हा पाऊस देखील पेरणी योग्य नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करु नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. उस्मानाबाद, परभणी, लातूर, बीड, जालना या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे.
  3. विदर्भात पोषक वातावरण
    15 जूनपासून पाच दिवस विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार अकोला, अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. अकोल्यात रात्रीपासूनच रिमझिम पावसाला सुरवात झाली तर सकाळी पुन्हा पावसाने जोर धरला होता. पावसामध्ये असेच सातत्य राहिले तर लवकरच खरीप पेरण्यांना सुरवात होणार आहे. तर अमरावतीमध्ये पावसाच्या आगमनानंतर शेतीच्या कामाला वेग आला आहे. पेरणीच्या वेळेवर धावपळ होऊ नये यासाठी अमरावती जिल्ह्यातील पळसखेड या गावात शेतकरी सोयाबीनच्या बियान्याला मोठ्या प्रमाणात मशिनच्या साह्याने बीज प्रक्रिया करत आहे.
  4. राज्याच्या राजधानीत पावसाला सुरवात
    कोकणाबरोबर मुंबईत दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून गायब होता. पण गुरुवारी सकाळपासून मुंबईसह मुंबई उपनगरातील कुर्ला, वांद्रे, खार, कांदिवली, बोरीवली, अंधेरी परिसरात अधूनमधून पाऊस पडत आहे, कुर्ला परिसरातही अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
  5. गोंदियात पेरण्या लांबणीवर
    महाराष्ट्र मध्ये मान्सून लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत असून विदर्भात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्हा मध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी येत असल्या तरी आवश्यक त्या प्रमाणात पावसाचा जोर कायम राहील असे चिन्हं नाहीत. त्यामुळे शेतकरी यांनी आपल्या मसागातीची सुरवात जरी केली असली तरीही मात्र जिल्हा मध्ये आवश्यतेनुसार पाऊस पडला नसल्याने शेतकरी मात्र आज चिंतातूर झाला आहे. आजही शेतकरी पावसाच्या अभावी पेरण्या खोळंबल्या आहे.