आईच्या अंत्यसंस्काराला पैसे नव्हते, तो हॉस्पिटलमध्ये मृतदेह तसाच सोडून गुपचूप निघून गेला, अखेर पोलिसांनी…

| Updated on: Jul 12, 2023 | 9:13 PM

मुलाकडे अंत्यसंस्कारालाही पैसे नव्हते. त्यामुळे त्याने त्याच्या आईचा मृतदेह रुग्णालयात तसाच सोडून पलायन केले.

आईच्या अंत्यसंस्काराला पैसे नव्हते, तो हॉस्पिटलमध्ये मृतदेह तसाच सोडून गुपचूप निघून गेला, अखेर पोलिसांनी...
no money for mother funeral
Image Credit source: socialmedia
Follow us on

लखनऊ : जिने जन्म दिला त्या आईच्या अंत्यसंस्काराला देखील एखाद्या मुलाकडे पैसे नसतील तर याला काय म्हणावे. एका तरुणाकडे पैसे नसल्याने त्याने आपल्या आईचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये तसाच सोडून पलायन केल्याचा खळबळजनक प्रकार येथील लोकबंधू रुग्णालयात उघडकीस आला आहे. आईच्या उपचारानंतरही तिचे प्राण वाचू न शकल्याने या तरुणाने तिचा मृत्यू होताच, मृतदेहाचा ताबा न घेताच हॉस्पिटलमध्ये तो तसाच सोडून तो निघून गेला…अखेर पोलिसांनाच ही जबाबदारी पार पाडावी लागली..

उत्तरप्रदेशातील लखनऊ शहरातील लोकबंधू रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एक बुजुर्ग महिला बीना ( वय 80) यांचे प्राण सोमवारी गेले. त्यांच्या मुलाकडे अंत्यसंस्कारालाही पैसे नव्हते. त्यामुळे त्याने त्याच्या आईचा मृतदेह रुग्णालयात तसाच सोडून पलायन केले. या संदर्भात जेव्हा कळले तेव्हा रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना याबाबत कल्पना दिल्यानंतर पोलिसांनी पावले उचलली. त्यानंतर कृष्णानगर पोलिस घटनास्थळी पोहचली. त्यानंतर इन्सपेक्टर विक्रम सिंह यांनी मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर आपसात पैसे गोळा करुन या महिलेवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

लोकबंधू हॉस्पिटलचे अधीक्षक अजय शंकर त्रिपाटी यांनी सांगितले की, ८ जुलै रोजी दीड वाजता ई- रिक्षा चालक त्याच्या आई बीना यांना भरती करण्यासाठी घेऊन आला होता. तो तिचा मुलगा असावा असे म्हटले जात आहे. बीना यांना फुप्फुसाचा आजार होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी त्यांची प्राणज्योत मालविली. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिचा पत्ता शोधण्यास सुरुवात केली, परंतू कोणीही वारसदार सापडले नाही. बीना यांच्या शेजारील खाटेवरील एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले की बीना याच्यासोबत दोन दिवस तिचा मुलगा थांबला होता. काही वेळापूर्वीपर्यंत तो थांबला होता. परंतू नंतर तो कधी निघून गेला ते कळलेच नाही. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. रुग्णालयाच्या रजिस्टरमध्ये त्यांचा पत्ता मेंहदी पाडा, माणकनगर असा लिहीला होता.

इन्स्पेक्टर कृष्णा विक्रम सिंह हे बीना यांच्या निवासस्थानी पोहचले तर घराला टाळा होता. शेजाऱ्यांनी बीना मूळची हरदोई येथील असल्याचे कळले. मुलगा जालंधर मध्ये मजदूरी करायचा. आईची तब्येत बिघडल्याने तो लखनऊला आला होता. आईच्या उपचारात सर्व पैसे खर्च झाले. सोमवारी आईची तब्येत अधिक बिघडल्याने डॉक्टरांनी हात टेकल्याने त्याने तेथून काढता पाय घेतला.