सनी पाजी, शॉटगन सिन्हा संसदेत खामोश, मावळत्या 17 व्या लोकसभेतील मौनी खासदारांची नावे पाहा

| Updated on: Feb 14, 2024 | 8:29 PM

पीआरएस लेजिस्लेटीव्ह रिसर्च या एनजीओने केलेल्या सर्वेक्षणात 17 व्या लोकसभेत संसदेत खासदारांनी सरासरी 45 चर्चांमध्ये सहभाग घेतला. ज्यात केरळ आणि राजस्थानच्या खासदारांनी सर्वाधिक चर्चांमध्ये सहभाग घेतल्याची आकडेवारी सांगते. संसदेत निवडून दिलेले खासदार जर संसदेत मौनी बाबा रहात असतील तर त्यांना का निवडून द्यावे असा सवाल निर्माण झाला आहे.

सनी पाजी, शॉटगन सिन्हा संसदेत खामोश, मावळत्या 17 व्या लोकसभेतील मौनी खासदारांची नावे पाहा
sunny deol and shatrughan sinha
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

नवी दिल्ली | 14 फेब्रुवारी 2024 : नागरिक आपले प्रश्न सुटावेत म्हणून लोकप्रतिनिधींना निवडून लोकसभेत पाठवत असतात. लोकशाहीच्या या मंदिरातील खालचे सभागृह लोकसभा असून त्यात देशातील मतदान करुन खासदारांना आपले दैनंदिन जीवनातील प्रश्न सुटावेत म्हणून त्यांना मतदान करीत असते. परंतू काही काही खासदार मंडळी त्यांचे टर्म संपत आली तरी आपले तोंड सभागृहात उघडत नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे लोकशाहीतील निवडणूकांना काही अर्थ राहीला नसल्याचे म्हटले जात आहे. तर पाहा तुम्ही निवडून दिलेल्या किती खासदार संसदेत मौनी बाबा म्हणून ओळखले गेले…

संसदेत अनेक खासदारांनी त्यांची टर्म संपत आली तरी आपले तोंड जनतेच्या प्रश्नांवर उघडलेले नाही. चित्रपटात दमदार डायलॉगने टाळ्या घेणारे सुपरस्टार सनी देओल आणि शॉटगन शत्रुघ्न सिन्हा मावळत्या 17 व्या लोकसभेत संसदेत हाताची घडी तोंडावर बोट ठेवूनच राहील्याचे उघडकीस आले आहे. 543 सदस्य संख्या असलेल्या सध्याच्या लोकसभेत एकूण 9 खासदार मौनी बाबा निघाले आहेत. ज्यांनी आपल्या तोंडातून एकही शब्द संसदेत काढलेला नाही. हा आकडा मोठा नसला तरी त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांचा हा अपमान आहे. या नऊ मौनी बाबा खासदारांपैकी सहा तर सत्ताधारी भाजपाचे आहेत. तर चार कर्नाटकातून निवडून आले आहेत.

सनी पाजी, शॉटगन सिन्हा खामोश

लोकसभेत ज्या खासदारांना बोलण्याची संधी मिळाली नाही अशा सदस्यांना गंभीर राष्ट्रीय मुद्द्यांवर आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळावी यासाठी लोकसभचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या सदस्यांशी संपर्क करीत त्यांचे मत मांडण्याची संधी दिली होती. ‘द हिंदू’ या वृत्तपत्रातील बातमी म्हटल्याप्रमाणे या खासदारांना शून्य काळात आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. परंतू या खासदारांनी या संधीचे सोने केले नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदार,अभिनेते सनी देओल यांच्याशी किमान दोन वेळा संपर्क केला होता. भाजपाचे खासदार असलेले सनी देओल पंजाबच्या गुरुदासपुर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. तर शत्रुघ्न सिन्हा यांना ममता बॅनर्जी यांनी टीएमसी पक्षातर्फे साल 2022 मध्ये प. बंगालच्या आसनसोल मतदार संघात झालेल्या पोट निवडणूकीत तिकीट देऊन लोकसभेत पाठविले होते. याआधी ते भाजपात होते. ही सीट गायक बाबुल सुप्रियो यांची होती, जे भाजपाच्या तिकीटावर येथून 2014 मध्ये जिंकले होते. त्यांनी भाजपातून बाहेर पडून ते तृणमूल कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर ही जागा खाली झाली होती.

मौनी बाबा खासदारांच्या यादीत पुढील नाव प.बंगालचे तमलुक लोकसभा मतदार संघाचे दिब्येंद्रू अधिकारी यांचे आहे. हे प.बंगाल विधानसभेचे विरोधी पक्ष नेते सुवेंदु अधिकारी यांचे धाकटे बंधू आहेत. राज्यात गेल्या विधानसभा निवडणूकांपूर्वी ते तृणमुल सोडून भाजपात गेले होते. सुवेंदु अधिकारी यांनी तृणमुल कॉंग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना पाडले होते.

या यादीत कर्नाटकच्या चार खासदारांची नावं

मौनव्रत धारण करणाऱ्या खासदारात कर्नाटकच्या चार खासदारांची नावे आहेत. बी.एन.बाचे गौडा ( चिकबल्लपुर ) , अनंतकुमार हेगडे ( उत्तर कन्नडा ) , वी.श्रीनिवास प्रसाद ( चामराजनगर ) आणि रमेश सी. जिगाजिनागी ( बीजापूर ) यांचीही नावे मौनी खासदारात सामील आहेत. हे चारही भाजपातून निवडून आले आहेत. तर आसमच्या लखीमपूर जागेवरून भाजपा खासदार प्रधान बुरुआ आणि बसपाच्या तिकीटावरुन घोसी येथून निवडून आलेले अतुल कुमार सिंह या यादी सामील अन्य दोन नावे आहेत.

या नऊ मौनी खासदारांपैकी किमान सहा खासदारांनी लेखी प्रश्न विचारुन संसदेच्या कामकाजात आपली उपस्थिती दाखविली. परंतू तीन सदस्य असे आहेत त्यांनी लेखी प्रश्न ही विचारले नाहीत आणि बोलले देखील नाहीत. अर्थात रमेश जिगाजिनागी बराच काळ आजारी होते. त्यामुळे त्यांना संसदेच्या कामकाजात सहभाग घेता आला नाही. बी.एन. बच्चे गौडा, अनंत कुमार हेगडे, व्ही श्रीनिवास प्रसाद आणि रमेश जिगाजिनागी हे चार कर्नाटकातील भाजप खासदार आहेत. या यादीत शत्रुघ्न सिन्हा, सनी देओल, अतुल राय, प्रदान बरुआ आणि दिव्येंदू अधिकारी यांचाही समावेश आहे. सिन्हा आणि राय वगळता बाकीचे सर्व खासदार भाजपचे आहेत. शत्रुघ्न सिन्हा हे टीएमसीचे खासदार आहेत आणि अतुल राय हे बसपाचे खासदार आहेत.