नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर (Odisha Balasore) येथील रेल्वे अपघाताने (Railway Accident) देशाला हादरवून सोडले. देशात पहिल्यांदा इतका मोठा रेल्वे अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 275 लोकांचा बळी गेला आहे. या अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताला कारणीभूत दोषींविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान या अपघातासंबंधी एक पत्र आता समोर आले आहे. हे पत्र सध्या चर्चेत आहेत. या पत्रात 3 महिन्यांपूर्वीच मोठ्या अपघाताची शंका व्यक्त करण्यात आली होती. रेल्वेच्याच एका अधिकाऱ्यांना (Railway Officer) याविषयीचा इशारा दिला होता. वेळीच त्यांची दखल घेतली असती तर कदाचित ही दुर्घटना टाळता आली असती.
कोण आहे अधिकारी
रेल्वे अधिकारी हरिशंकर वर्मा यांनी रेल्वे बोर्डाला सिग्नल सिस्टममधील दोषाबद्दल पत्र लिहिले होते. तसेच याचा वापर करुन अथवा त्याकडे दुर्लक्ष झाल्यास मोठ्या अपघाताला निमंत्रण देण्यासारखे होईल, असा इशारा दिला होता. वर्मा हे सध्या उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे कार्यरत आहेत. ते तीन वर्षांपासून दक्षिण-पश्चिम रेल्वेत कार्यरत होते. त्यावेळी ते प्रिन्सिपल चीफ ऑपरेशन मॅनेजर होते. त्याचवेळी दक्षिण पश्चिम रेल्वे चुकीच्या रुळावरुन धावल्याचे एक प्रकरण त्यांच्यासमोर आले होते.
पण कोणावरच कारवाई नाही
रेल्वे अधिकारी हरिशंकर वर्मा यांनी यंत्रणेतील हा दोष उघड केला. इंटरलॉकिंग तंत्राला बायपास करत, त्याकडे दुर्लक्ष करत लोकेशन बॉक्समध्ये गडबड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकारावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली. त्यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे रेल्वे बोर्डाला पत्राद्वारे कळविले. तसेच दोषींविरोधात कडक भूमिका घेण्याची विनंती केली. पण कोणावरच काही कारवाई झाली नाही.
नंतर बदलण्यात येतो मार्ग
वर्मा यांच्या पत्रात यंत्रणेतील गडबड आणि दोष मांडण्यात आले. तसेच हा गंभीर प्रकार असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. ट्रेन सुरु झाल्यानंतर रुटमध्ये बदल करण्यात येत असल्याचे समोर आले. सिग्नल संबंधीचे काम कनिष्ठ कर्मचारी हाताळत असल्याने, त्यामुळे मोठा धोका होण्याचा इशारा वर्मा यांनी दिला होता.
असा झाला अपघात
शुक्रवारी हा मोठा अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची बहनागा स्टेशनजवळ एकमेकांना जोराची धडक बसली. यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस ही नेमकी शेजारील रेल्वे रुळावरुन जात होती, त्याच रुळावर कोरोमंडल एक्स्प्रेसचे डब्बे येऊन पडले. त्याही रेल्वेगाडीचा अपघात झाला. या तिहेरी अपघातात अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले. चार डब्बे रेल्वे रुळ परिघाच्या बाहेर फेकले गेले. एकूण 15 डब्बे रुळावरुन घसरले. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखाच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच गंभीर जखमींसाठी दोन लाख आणि किरकोळ जखमींसाठी 50 हजाराच्या भरपाईची घोषणा करण्यात आली आहे.