पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात भाष्य अखेर ‘त्या’ मंत्र्यांना भोवले, मंत्री मंडळातून हकालपट्टीची कारवाई

| Updated on: Jan 07, 2024 | 8:44 PM

भारताविरोधात भाष्य करणाऱ्या मंत्र्यांवर मालदीव सरकारने कडक कारवाई केली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे त्याला निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारतात संतापाची लाट उसळली होती.

पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात भाष्य अखेर त्या मंत्र्यांना भोवले, मंत्री मंडळातून हकालपट्टीची कारवाई
pm narendra modi
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मालदीव | 07 जानेवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवड्याच्या सुरुवातीला लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यांनी या दौऱ्याची छायाचित्रे ट्विट केली. तसेच लक्षद्वीपच्या दौऱ्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले. ज्यांना साहसाची आवड आहे त्यांनी लक्षद्वीपमध्ये नक्की यावे असे आवाहन त्यांनी केले होते. इतकचं नव्हे तर पंतप्रधान मोदी यांनी ‘मी समुद्रात डुबकी मारली आणि इथे स्नॉर्कलिंगही केल्याचे लिहिले होते’. मोदी यांच्या या ट्विटनंतर तीन मंत्र्यांनी आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट केली होती. मात्र, अशी पोस्ट करणे त्या मंत्र्यांना भोवले आहे. सरकारने त्या तीन मंत्र्यावर निलंबनाची मोठी कारवाई केली आहे.

भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मालदीव सरकारमधील तीन मंत्र्यांनी सोशल मिडीयावर टिप्पणी केली होती. याच तीन मंत्र्यांवर मालदीव सरकारने कडक कारवाई केली आहे. मंत्री मरियम शिउना, मालशा और हसन जिहान यांच्यावर मालदीव सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. मालदीव सरकारने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.

सरकारमधील मंत्री मरियम शिउना, मलशा आणि हसन जिहान यांना निलंबित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षदीप भेटीनंतर मालदीवचे अध्यक्ष मुइज्जू यांच्या पक्षाच्या एका नेत्याने ‘तुम्ही आमच्यासारख्या सुविधा कशा देऊ शकाल? भारतात हॉटेलच्या खोल्यांमध्ये नेहमीच दुर्गंधी येते अशी टीका त्यांनी केली होती.

भारतविरोधी वक्तव्यामुळे या मंत्र्यांना त्यांच्याच देशातून विरोध झाला. मंत्र्याच्या या विधानांवर मालदीवचे माजी अध्यक्ष नशीद आणि इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी टीका केली होती. इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी ट्विट करून ‘सोशल मीडियावर मालदीवच्या सरकारच्या मंत्र्यांनी भारताविरोधात द्वेषपूर्ण भाषेचा वापर केल्याचा मी निषेध करतो. भारत हा मालदीवचा नेहमीच चांगला मित्र आहे आणि आम्ही अशा कठोर टिप्पण्यांमुळे दोन्ही देशांमधील जुन्या मैत्रीवर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नये असे म्हटले होते.

मालदीव मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे भारतातील लोकही मोठ्या प्रमाणात संतापले होते. त्यांनी मालदीवच्या सहली रद्द करण्यास सुरुवात केली. त्याचा स्क्रीनशॉट ते सोशल मीडियावर शेअर करू लागले. ‘बॉयकॉट मालदीव’ या हॅशटॅगदेखील सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला.

भारतातील अनेक सेलिब्रिटींनीही मालदीववर केलेल्या कमेंटवर ट्विट करायला सुरुवात केली. हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून मालदीवकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झाले. पण, तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली आणि अखेर मालदीव सरकारला आपल्या मंत्र्यांवर कारवाई करावी लागली.

मालदीवच्या त्या तीन मंत्र्यावर कारवाई करण्याच्या आदल्या दिवशीच मालदीव सरकारने एक निवेदन जारी केले होते. ज्यामध्ये त्यांनी मंत्र्यांची वक्तव्ये ही त्यांची वैयक्तिक विधाने आहेत. सरकारशी याचा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु, लोकाचा वाढता विरोध लक्षात घेऊन अखेर सरकारने त्या तीन मंत्र्याच्या निलंबनाची कारवाई केली.