मुंबई : 16 ऑगस्ट 2023 । इंदोर येथील 14 मित्रांचा एक ग्रुप सहलीसाठी गेला होता. शनिवार, रविवार आणि त्यापाठोपाठ 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन, पतेती या सणाच्या आलेल्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी तो ग्रुप पिकनिकला निघाला होता. इंदोर येथून त्यांनी प्रवास सुरू केला. देवास जिल्ह्यातील उदयनगर आणि इंदूरच्या खुडैल यांच्या दरम्यान असणारे भैरव कुंड हा ठिकाण त्यांनी सहलीसाठी निवडले होते. 15 ऑगस्ट रोजी ते 14 मित्र भैरव कुंड येथे पोहोचले. सकाळपासुन त्यांची मौजमजा सुरू होती. दुपारचे जेवण झाल्यानंतर त्यातील काही मित्र भैरव कुंड धबधब्याजवळ गेले. भैरव कुंड तलावात ते सगळे मित्र पोहोण्यासाठी उतरले. त्यातील एक मित्र पाण्यात बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी दोघे जण पुढे आले. पण, त्या मित्राला वाचवण्याच्या नादात ते ही पाण्यात बुडू लागले.
भैरव कुंड परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धबधब्याजवळील तलावात पाण्याचा मोठा प्रवाह होता. ते तीन जण खोल पाण्यात बुडत होते. जिवाच्या आकांताने वाचवा…! वाचवा…! म्हणुन ओरडत होते. पण, तलावाजवळ उपस्थित असलेल्या अनेक लोकांपैकी कुणीही त्या बुडणाऱ्या तीन तरूणांना वाचविण्यासाठी पुढे आले नाहीत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पिकनिक साजरी करण्यासाठी आलेले ते तरुण मौजमजा करताना खोल पाण्यात बुडाले. एक तरुण बुडू लागला तेव्हा इतर तरुणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळातच ते तिघेही पाण्यात बुडाले.
यासीन अली (रा. चंदननगर), सुफियान (रा. खजराना) आणि जाफर (रा. ग्रीन पार्क) अशी बुडालेल्या तीन तरुणांची नावे आहेत. ते तिघेही इंदूरचे रहिवासी आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बचाव पथकासह घटनास्थळ गाठले. पोलिसांनी त्या बुडालेल्या तरूणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्र झाल्यामुळे बचाव पथकाने शोध थांबवला.
आज सकाळी बचाव पथकाने पुन्हा बचावकार्य सुरू केले. या तीनही तरूणांचे मृतदेह सापडले. त्या तरूणांच्या मित्रांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आमचे मित्र बुडत असताना काही जण व्हिडीओ काढत होते. पण, ते मदत मागत असताना कुणी पुढे आले नाही. त्यांना वाचवण्याचे धाडस कोणीच केले नाही.