पंजाब : पंजाबमधील भटिंडा मिलिटरी स्टेशनवर 12 एप्रिलला झालेल्या रॅपिड फायरिंगमध्ये चार जवानांना प्राण गमवावे लागले. प्राथमिक माहितीमधून हा हल्ला दहशतवाद्यांनी केल्याचे समोर आले होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीतून हा दहशतवादी हल्ला नव्हता तर येथील एका जवानाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्या जवानाने आपल्या कृत्याची कबुली दिली असून त्याने संपूर्ण घटनाक्रमही सांगितला आहे. देसाई मोहन असे या जवानाचे नाव आहे. तो तोफखाना युनिटचा गनर आहे.
लष्कराने याबाबत माहिती देताना सांगितले की, सतत चौकशी केल्यानंतर तोफखाना युनिटचा गनर देसाई मोहन याने पोलिसांसमोर इन्सास रायफल चोरून तिच्या सहाय्याने आपल्या 4 सहकारी सैनिकांची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
देसाई मोहन याने 9 एप्रिल 2023 रोजी सकाळी भरलेल्या मॅगझिनसह रायफल चोरून ती एका ठिकाणी लपवली. 12 एप्रिल रोजी पहाटे साडे चारच्या सुमारास त्याने चोरलेली रायफल लपवलेल्या ठिकाणाहून कडून पहिल्या मजल्यावर नेली. तेथे झोपेत असलेल्या चार जवानांवर ती रायफल चालवून त्यांची हत्या केली. त्या रात्री तोफखाना देसाई मोहन सेन्ट्री ड्युटीवर होता, असे लष्कराने सांगितले.
देसाई मोहन याने गुन्हा केल्यानंतर रायफल आणि सात गोळ्या कँटोन्मेंटमध्ये असलेल्या गटाराच्या खड्ड्यात फेकल्या. देसाई मोहन याने रायफल, मॅगझीन आणि एलएमजीच्या आठ राउंड चोरून या गुन्ह्यात त्याचा वापर केला होता.
आरोपी देसाई मोहन याने ज्या चार जवानांची हत्या केली त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्याला अनैसर्गिक अत्याचार करून त्याची मानसिक आणि शारीरिक छळवणूक केली होती. त्यामुळे आतून सुडाने पेटलेल्या देसाई मोहन याने त्यांचा बदला घेण्यासाठीच त्या चार जणांची हत्या केली.
या घटनेनंतर प्राथमिक एफआयआर नोंदवताना 12 एप्रिल रोजी आरोपीने तपास यंत्रणांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याने साध्या वेशातील दोन व्यक्ती इंसास रायफल आणि कुऱ्हाडी घेऊन आत घुसले होते अशी माहिती दिली होती. त्यामुळे हा दहशतवादी हा हल्ला असावा अशी भीती व्यक्त करण्यात येत होती,
देसाई मोहन यांची चौकशी करता असताना त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास करण्यात आला. सध्या वेशातील दोन व्यक्ती आत घुसून फायरींग करताना त्यांना कुणीच पाहिले नाही. तसेच, त्याला देसाई यांने प्रतिकार का केला नाही असे प्रश्न विचारल्यावर देसाई गोंधळला. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची माहिती दिली.