नवी दिल्ली | 19 ऑगस्ट 2023 : जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील महागाईत (Inflation) खऱ्या अर्थाने टोमॅटोने तेल ओतले. टोमॅटोने किंमतीत इतिहास घडवला. किंमतींनी 200 रुपयांपर्यंत उसळी घेतली. तर काही शहरात या किंमती 300 रुपयांच्याही पुढे गेल्या होत्या. खास करुन उत्तर भारतात टोमॅटो अनेक घरातून हद्दपार झाला होता. अवकाळी आणि मुसळधार पावसाने टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला. टोमॅटोच्या किंमती (Tomato Price) भडकल्या. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून देशभरात टोमॅटोचा पुरवठा होत होता. तरीही मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने भावाने उसळी घेतली. केंद्र सरकारने नेपाळमधून टोमॅटो आयातीला परवानगी दिल्याने भावात नरमाई आली होती. अनेक शहरात टोमॅटोच्या किंमती 100 रुपयांच्या आतबाहेर होत्या. आता त्यात अजून घसरण होणार आहे.
मोठी कसरत
टोमॅटोच्या घाऊक आणि किरकोळ किंमतीत घसरण होत आहे. नाफेड आणि ग्राहक सहकारी संस्थांची मदत त्यासाठी घेण्यात येईल. गेल्या महिन्यापासून या संस्था भाव आटोक्यात आणण्यासाठी विविध प्रयोग करत आहेत. भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ लिमिटेड, नाफेडने भाववाढ रोखण्यासाठी प्रयत्न केले.
टोमॅटो होणार स्वस्त
गेल्यावेळी बाजारात टोमॅटोच्या किंमती घसरल्या. त्यानंतर हे भाव 70 रुपये किलोवर आणण्यात आले. त्यासाठी या सहकारी संस्थांनी विक्रीचे स्टॉल सुद्धा लावले. तरीही किंमतीत वाढ होत होती. ग्राहक मंत्रालयाच्या निर्देशानुसार आता आवक वाढल्याने या किंमती अजून स्वस्त होत आहे. आता टोमॅटो 40 रुपये प्रति किलो दराने विक्री होईल. 20 ऑगस्टपासून नाफेड या भावाने टोमॅटो विक्री करणार आहे. देशातील अनेक शहरात ही सुविधा सुरु होत आहे.
15 लाख किलो टोमॅटोची खरेदी
सुरुवातीला केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने सबसिडी आधारे 90 रुपये प्रति किलोने दिल्लीसह उत्तर भारतात टोमॅटोची विक्री केली. नेपाळच्या टोमॅटोची मात्रा लागू झाल्याने भावात घसरण झाली. 15 ऑगस्ट रोजी किरकोळ किंमती 50 रुपये प्रति किलोवर येऊन धडकल्या. आता 20 ऑगस्टपासून टोमॅटो 40 रुपये प्रति किलो दराने विक्री होईल. त्यासाठी भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ लिमिटेड,नाफेड यांनी 15 लाख किलो टोमॅटोची खरेदी करण्यात आली.
आयातीवरील बंदी उठवली
नेपाळमधून टोमॅटोच्या आयातीवर यापूर्वी असलेली बंदी केंद्र सरकारने नुकतीच उठवली. दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू स्वस्त करण्यासाठी केंद्र सरकार अनेक प्रयत्न करत आहेत. नेपाळमधून टोमॅटोच्या आयातीवर आता कोणतेही प्रतिबंध राहणार नाही. टोमॅटोची आवक वाढल्याने उत्तर भारतासह दक्षिणेत सुद्धा टोमॅटोच्या किंमती घसरल्या आहेत.