Political News | महाराष्ट्रात अजित पवार यांच्या बंडामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. अजित पवार यांच्यामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. शरद पवार यांचे विश्वासू आणि पहिल्या फळीतील दिग्गज नेते सत्तेत सामील झाले. अजित पवार यांच्यासह एकूण 9 जणांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. त्यानंतर दादांनी राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ या चिन्हावर दावा केला. अजित पवार यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील जनतेला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संघर्ष पाहायला मिळणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाहीये. राष्ट्रवादीतील बंडानंतर आता विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. राज्यात राजकीय उलथापालथी सुरुच आहेत. महाराष्ट्रात राजकीय घडामोडी सुरु असताना त्रिपुरा राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे. त्रिपुरात एकूण 5 आमदारांचं निलंबन करण्यात आलंय.
एकूण 5 आमदारांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलंय. यामुळे राजकीय विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. त्रिपुरात शुक्रवारी 7 जुलै रोजी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशेनाला सुरुवात झाली. या पहिल्याच दिवशी फुल्ल राडा झाला. भारतीय जनता पार्टी आणि तिप्रा मोठा पार्टी आमदार एकमेकांना भिडले. रस्त्यावर ज्या प्रकारे राडा होतो, त्याचप्रमाणे हे दोन्ही पक्षांचे आमदार आपआपसात भिडले. आमदार विधानभवनात टेबलवर चढून घोषणाबाजी करु लागले. फक्त एकमेकांची डोकी फोडायची बाकी राहिली होती. या सर्व प्रकरणानंतर एकूण 5 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
आता हे दोन्ही पक्षाचे आमदार आमनेसामने का आले, नक्की काय झालं? हे आपण जाणून घेऊयात. मिळालेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली. विरोधीपक्ष नेता अनिमेश देबबर्मा यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि वादाला तोंड फुटलं. विधानसभेत बागबासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जादब लाल नाथ हे अश्लिल चित्रफीत पाहत होते. या मुद्द्यावरुन देबबर्मा यांनी प्रश्न उपस्थित केला. विधानसभा अध्यक्षांनी या प्रश्नाला महत्व न देता प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करावी, असं म्हटलं. यामुळे देबबर्मा यांचा पारा चढला.देबबर्मा यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. घोषणेबाजीचं रुपांतर राड्यात झालं. आमदार आक्रमक झाले. काही आमदार हे टेबलवर चढले आणि विरोध करायला लागले.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली
#WATCH | Agartala | A ruckus broke out between the MLAs of BJP & Tipra MOTHA party during Tripura Assembly session today. pic.twitter.com/hdEBpOoEXD
— ANI (@ANI) July 7, 2023
मात्र विधानसभेच्या कामकाजात अडथळा आणल्याने अध्यक्ष बिश्व बंधू सेन यांनी 5 आमदारांना एका दिवसााठी निंलंबित केलं. या 5 आमदारांमध्ये तिप्रा मोठा पार्टीच्या 3, माकप आणि काँग्रेसच्या प्रत्येकी 1-1 आमदारांचा समावेश आहे.या एकदिवसीय निलंबित आमदारांमध्ये काँग्रेसचे सुदीप रॉय बर्मन, माकपचे नयन सरकार तर तिप्रा मोठा पार्टीतील बृस्वकेतु देबबर्मा, नंदिता रियांग आणि रंजीत देबार्मा यांचा समावेश आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या या कारवाईनंतर विरोधकांनी सभात्याग केला.