अहमदाबाद : मागील आठवड्यांपासून बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात परिसरात या वादळाचा मोठा फटका बसत आहे. सध्या बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या कच्छमध्ये धडकत आहे. हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे की, चक्रीवादळाचा वेग मंदावल्यामुळे ते जमिनीवर येण्यास वेळ लागत आहे. मात्र, जोरदार वारा आणि पावसामुळे गुजरातमधील अनेक शहरांमध्ये विध्वंसही होत आहे. कच्छ, जामनगर आणि द्वारकामध्ये जोरदार वारा आणि पावसामुळे रस्त्यांवरील अनेक झाडे आणि होर्डिंग्ज उन्मळून पडले आहेत.
तर प्रशासनाकडून सर्व तयारी केली असली तरी या आपत्तीमुळे गुजरातमध्ये मोठे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या वादळाचा अंदाज हवामान खात्याने 6 जून रोजीच वर्तवला होता, त्यानंतर ज्या परिसराला वादळाचा तडाका बसणार आहे, त्या भागातील नागरिकांना बाहेर काढून सुरक्षास्थळी हलवण्यात आले होते. या भागात राहणाऱ्या सुमारे 74 हजार लोकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर बिपरजॉय वादळाचा मोठा तडाका बसल्यानंतर संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन बचावकार्यासाठी विमानांपासून जहाजांपर्यंत सर्व गोष्टी तैनात करण्यात आल्या आहेत.
गुजरातमधील भुजमध्ये सुमारे 200 विजेचे खांब पडले असून 6 भागातील वीज उपकेंद्रे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. तर 15 हून अधिक जलनिर्मिती केंद्रांवर अनेक समस्या आल्या आहेत. या भागातील रस्त्यांवर सुमारे 200 झाडे उन्मळून पडली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर भुजमध्येच नाही तर द्वारका, कच्छ, जामनगर आणि इतर शहरांमध्येही गंभीर परिस्थिती होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
गुजरातमधील द्वारका येथे अग्निशमन दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, ही सर्व टीम सुरत, नडियाद आणि धोडका येथून पाचारण करण्यात आली आहे. तर द्वारकेमध्ये आधीच एक टीम तैनात करण्यात आली होती. ओखा येथे अतिरिक्त पथक पाठविण्यात आले आहे. रस्त्यावर पडलेली झाडे तातडीने हटविण्याचे काम या पथकाकडून सुरु आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमधील अनेक रेल्व स्थानकांवरीस रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली आहे. रेल्वेने जारी केलेल्या माहितीनुसार, बिपरजॉयमुळे 99 गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे खात्याने दिली आहे.