नवी दिल्ली | TV9 नेटवर्कच्या च्या वार्षिक कॉन्क्लेव्ह ‘What India Thinks Today’ च्या दुसऱ्या पर्वामध्ये एआयएमआयएम नेते आणि खासदार असदुद्दीन औवेसी यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना अयोध्या प्रकरणावर बोलताना श्रद्धेच्या आधारावर निर्णय घेतला तर पुराव्याचे काय होणार? असा सवाल केला. बाबरी मशिद पाडणाऱ्या एकाही आरोपीला शिक्षा झाली नसल्याचंही औवेसी यावेळी म्हणाले.
व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या ‘सत्ता संमेलन’मध्ये असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, देशातील सर्वात मोठ्या न्यायालयाने श्रद्धेच्या आधारावर निर्णय दिला आहे. श्रद्धेच्या आधारावर निर्णय घेतला तर पुराव्याचे काय होणार? राम मंदिराच्या निर्णयावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बाबरी मशिदीत मूर्ती ठेवल्या नसत्या तर 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचा कार्यक्रम झाला असता का? असा सवाल औवेसींनी केला.
आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, आम्ही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. शेतकरी चळवळ ही बिगर राजकीय चळवळ आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन हे अराजकीय आंदोलन असल्याने त्यांच्या समर्थनार्थ आम्ही तिथे गेलो नाही. तिथे जाऊन आम्हाला वातावरण बिघडवायचे नाही, असं औवेसी शेतकरी आंदोलनावर बोलताना म्हणाले.
भाजपसोबत जुळवून घेऊन मी स्वतःवर हल्ला केला का? माझ्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या. माझ्या घरावर हल्ला झाला. लोकसभा निवडणुकीसाठी इतर पक्षांसोबत युती करण्याबाबत औवेसी म्हणाले की, होय, आम्ही नक्कीच युती करू. आम्ही अजूनही बोलत आहोत. याबाबत आम्ही सध्या कोणताही खुलासा करू शकत नाही. अनेक राज्यांमध्ये आमची चर्चा सुरू असल्याची माहिती औवेसी यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील यावर बोलताना नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, अशी माझी इच्छा नाही. मी स्वतःला पंतप्रधान होण्याचं स्वप्न कधीच पाहत नसल्याचं औवेसी यांनी सांगितलं.