मुंबई : तंत्रज्ञानाच्या युगात फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. ऑनलाईन गंडा घालण्याची अनेक गुन्हे गेल्या काही वर्षात उघड झाले आहेत. असं असताना आता व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून सेक्सटॉर्शनची प्रकरणं वेगाने वाढत आहेत. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून अश्लिल व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल केलं जात आहे. आता गुन्हेगारांची हिंमत इतकी वाढली आहे की, त्यांच्या रडावर केंद्रीय मंत्री आले आहेत. अशीच एक घटना जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्यासोबत घडली आहे. ब्लॅकमेल करणाऱ्या सर्राईत गुन्हेगारांनी थेट केंद्रीय मंत्र्यांना व्हॉट्सॲप कॉल केला आणि अश्लिल व्हिडीओ दाखवला. या नंतर त्यांनी तात्काळ फोन कट केला.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी याबाबतची माहिती तात्काळ दिल्ली क्राईम ब्रांचला दिली. त्यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरली आणि या प्रकरणाची धागेदोरे राजस्थानच्या भरतपूरपर्यंत पोहोचल्याचं दिसून आलं. पोलिसांनी सापळा रचून दोन जणांना अटक केली. पकलेल्या आरोपींची नाव मोहम्मद वकील आणि मोहम्मद साहिब अशी आहेत.
दोन्ही आरोपी सेक्सटॉर्शन कॉल करणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचं समोर आलं आहे. तसेच या प्रकरणातील मास्टरमाईंड साबिर फरार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी आता सापळा रचला आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून लोकांना पहिल्यांदा व्हिडीओ कॉल केला जातो आणि त्यानंतर अश्लिल व्हिडीओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल केलं जातं.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “तपास यंत्रणांच्या माहितीनुसर एका सिमचा वापर 36 इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी नंबरसाठी केला होता. तर दुसऱ्याचा वापर 18 आयएमआय नंबरसाठी केला होता. आरोपींकडून मोबाईल जप्त केला आहे आणि फॉरेंसिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे.”
केंद्रीय मंत्र्यांनी तात्काळ कारवाई केल्याने पोलिसांचे आभार मानले आहेत. तसेच अशा कॉलच्या माध्यमातून कोणी सामन्य व्यक्ती अडकला असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. तसेच अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी केली आहे.