बटर चिकन आणि दाल मखनीवरुन कोर्टात लढाई, काय आहे नेमकं प्रकरण?

| Updated on: Jan 21, 2024 | 4:06 PM

बटर चिकन आणि दाल मखनी यांचे नुसतं नाव काढलं तरी अस्सल खवय्यांच्या तोंडात पाणी येतं. परंतू या जगप्रसिद्ध डीशेसच्या मालकीवरुन दोन बड्या रेस्टॉरंटमध्ये हमरीतुमरी माजली आहे. दिल्लीच्या हायकोर्टापर्यंत हे प्रकरण पोहचले आहे.

बटर चिकन आणि दाल मखनीवरुन कोर्टात लढाई, काय आहे नेमकं प्रकरण?
butter chicken dal makhani
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

नवी दिल्ली | 21 जानेवारी 2024 : बटर चिकन आणि दाल मखनी यांचे चाहते जगभरात आहेत. या डीशेशचं नुसतं नाव काढले तरी अस्सल खवयांचा जठराग्नी पेटतो.  या परंतू या जगविख्यात डीशेसचा शोध कोणी लावला ? यावरुन लढाई सुरु झाली असून ती आता दिल्ली हायकोर्टात पोहचली आहे. दिल्लीतील दोन प्रसिद्ध रेस्टॉरंटनी या दोन जगप्रसिध्द डीशेसवर आप-आपला दावा ठोकल्याने हे प्रकरण आता जजेसच्या बेंचकडे पोहचले आहे. नवी दिल्लीतील प्रसिध्द रेस्टॉरंट मोती महलने या डीशेस श्रेय घेण्यासाठी दरियागंज रेस्टॉरंटवर खटला दाखल केला आहे.

मोती महल रेस्टॉरंटच्या मालकांनी त्यांचे दिवंगत संस्थापक शेफ कुंडल लाल गुजराल यांनी बटर चिकन आणि दाल मखनी यांचा शोध लावल्याचा दावा केला आहे. दरियागंज रेस्टॉरंट या दोन्ही डीश त्यांचा शोध असल्याचा चुकीचा दावा करीत लोकांची दिशाभूल करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरियागंज रेस्टॉरंट आणि मोती महल रेस्टॉरंटमध्ये एक संबंध आहे. कारण त्याची पहीली शाखा जुनी दिल्लीच्या दरियागंज विभागात सुरु केली होती.

दरियागंज रेस्टॉरंटच्या मालकांनी त्यांचे पूर्वज स्वर्गीय कुंदन लाल जग्गी यांनी या दोन्ही डीशचा शोध लावल्याचा दावा करु नये अशी याचिका मोती महल रेस्टॉरंटच्या मालकांनी हायकोर्टात दाखल केली आहे. तसेच दरियागंज रेस्टॉरंटने त्यांची वेबसाईट आणि फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन आणि ट्वीटरसह विविध सोशल मिडीया वेबसाईट तसेच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयातून ‘बटर चिकन आणि दाल मखनी’च्या शोध लावण्याच्या टॅगलाईनचा वापर करू नये अशी मागणी मोती महल रेस्टॉरंटने केली आहे.

29 मे रोजी पुढील सुनावणी

दिल्ली हायकोर्टाचे न्या.संजीव नरुला यांनी अलिकडेच दरियागंज रेस्टॉरंटच्या मालकांना समन्स जारी केले होते. त्यात मालकांना वादीच्या कागदपत्रांना स्वीकार किंवा अस्वीकार करण्याचा प्रतिज्ञापत्रासह लेखी जबाब सादर करायला सांगितला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 मे रोजी ठेवली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बटर चिकन आणि डाल मखनीचा शोध आपणच लावल्याचा दावा दोन्ही रेस्टॉरंट्स करीत आहेत.

मोती महलचा दावा

मोती महल रेस्टॉरंट संस्थापक स्व. गुजराल यांनी पहिली तंदूरी चिकन तयार केले होते. नंतर बटर चिकन आणि दाल मखनी तयार केली. फाळणी नंतर त्यांनी भारतात या डीश आणल्या. त्यावेळी फ्रिज नसल्याने उरलेले चिकन स्टोअर करता येत नव्हते. गुजराल यांनी आपल्या शिजवलेल्या चिकनला सुखण्यापासून वाचविण्यासाठी एक सॉस आणले. यातून बटर चिकनचा शोध लागला. डाल मखनीचा शोधही बटर चिकनद्वारेच लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तानच्या पेशावर येथील ‘मोती महल’ रेस्टॉरंटचा एक फोटोबद्दल प्रतिवादी वकीलाने दोन्ही पक्षांचे संस्थापक ( मोती महलचे गुजराल आणि दरियागंजचे जग्गी ) यांच्या द्वारा संयुक्त रुपाने हे हॉटेल सुरु केले होते असे म्हटले आहे.