उदयपूर: उदयपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या (congress) चिंतन शिबिरातून नवीन ऊर्जा घेऊन काँग्रेस बाहेर पडेल. या शिबिरातून काँग्रेसचं वेगळेपण अपेक्षित आहे. आव्हानं वेगळ्या पद्धतीची आहेत. त्यामुळे त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा विचार करावा लागेल. समाज बदलत आहे. राजकीय समिकरणं बदलत आहेत. भाजपसारखं (bjp) राजकीय मोठं आव्हान आमच्यासमोर आहे. या परिस्थितीत आमची रणनिती त्याच पद्धतीनं त्यांच्यावर मात करुन विजय प्राप्त करणारी असेल. काँग्रेसला बदलावं लागेल आणि बदलून नव्या पद्धतीनं सामोरं जावं लागेल, असं सांगतानाच उदयपूरमध्ये विविध धोरणांवर चर्चा झाली. चिंतन शिबिरात जे धोरणं ठरतील ते महाराष्ट्रालाही लागू होईल, असं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्रातही एक कुटुंब, एक तिकीट हा फॉर्म्युला काँग्रेस स्वीकारणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
अशोक चव्हाण यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. तरुणांनाच संधी ही काँग्रेसमध्ये जुनी प्रक्रिया आहे. राजीव गांधी यांच्यापासून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. ज्या पद्धतीनं संवैधानिक संस्था संकटात आहेत, रिजनल पार्टी समोर येत आहेत, त्यांच्यासोबत आघाडी करण्याचे विषय, तृष्टीकरणाचा प्रयत्न भाजपने सुरु केलाय. त्यातून मतपेटी भरण्याचा डाव सुरु आहे. जातीयता, जातीय वाद याला उत्तर देण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरेल, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
एक कुटुंब एक तिकीट यावर अद्याप चर्चा झाली नाही. पण त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या शिबिरात आतापर्यंत काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा झालेली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. मात्र, उदयपूरच्या चिंतन शिबिरात जे काही निर्णय होईल, त्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनेची आज रॅली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री काम करत आहेत. त्यांचा पक्ष वाढवण्याचं काम ते करू शकतात. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्हालाही आमचा पक्ष वाढवायचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिल्लीत प्राचीन मंदिरात हनुमान चालिसाचं पठण सुरू केलं आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. नवनीत राणा यांनी आरत्या करत राहावं, पुण्य मिळेल त्यांना, असा टोला चव्हाण यांनी लगावला आहे.