Video | वंदेभारत एक्सप्रेसला घातपात करण्याचा प्रयत्न, रुळांवर ठेवले होते दगड आणि लोखंड…तेवढ्यात..

| Updated on: Oct 02, 2023 | 6:39 PM

वंदेभारत एक्सप्रेस सुरु झाल्यानंतर या गाडीने गुरांना उडविल्याचे अनेक अपघात घडले होते. त्यानंतर या गाडीवर दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. आता या गाडीच्या रुळांवर दगड आणि लोखंड ठेवून अपघात घडविण्याचा प्रयत्न लोको पायलटच्या प्रसंगावधनाने सुदैवाने टळला आहे.

Video | वंदेभारत एक्सप्रेसला घातपात करण्याचा प्रयत्न, रुळांवर ठेवले होते दगड आणि लोखंड...तेवढ्यात..
Vande bharat express
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 2 ऑक्टोबर 2023 : उदयपूर – जयपूर वंदेभारत ट्रेन क्र. 20977 च्या मार्गादरम्यान राजस्थानच्या चित्तोडगड-भीलवाडा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर अज्ञात समाजकंटकांनी रुळांवर दगड आणि लोखंड ठेवून या गाडीला अपघात करण्याचा डाव पायलटच्या प्रसंगावधनाने सुदैवाने उधळला आहे. या ट्रेनच्या लोको पायलटने लागलीच ब्रेक लावून गाडी थांबविली. दहा मिनिटे गाडी थांबवून रेल्वे कर्मचाऱ्यांनी धोकादायक दगड आणि लोखंड हटविले त्यानंतर ट्रेनला पुन्हा मार्गस्थ करण्यात आले आहे.

लोको पायलटचे प्रसंगावधान

गंगरार-सोनियाना दरम्यान रेल्वेच्या रुळांवर दगड ओळीने रचून ठेवलेले पायलटला आढळले. तसेच रुळांच्या प्लेटमध्ये लोखंडाचे खिळे रोवून अडथळे तयार केले होते. त्याच वेळी उदयपूर-जयपूर वंदेभारत येथून जाणार होती. त्याचवेळी सर्तक लोको पायलटचे त्याकडे लक्ष गेले. लोको पायलटने तातडीने गंगरार-सोनियाना सेक्शनच्या किमी नंबर 158/18 वर आपतकालीन ब्रेक लावून ट्रेन थांबविले. त्यामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला आहे.

घटनास्थळी पोहचले अधिकारी

ही धक्कादायक घटना आरपीएफ पोस्ट भीलवाडा क्षेत्रात सकाळी 9.55 वाजता घडली. हे ठिकाण चित्तोडगड जिल्ह्यातील गंगरार येथे आहे. या घटनेची बातमी कळताच डीएससी अजमेर, आयपीएफ भीलवाडा, सिनियर सेक्शन इंजिनिअर गंगरार आणि स्थानिक पोलिसांनी घटना स्थळांवर पोहचून तपास सुरु केला आहे.

येथे पाहा फोटो –

काही दिवसांपूर्वी मथुरात घडला अपघात

अलिकडेच 27 सप्टेंबरच्या रात्री उशीरा उत्तरप्रदेशातील मथुरा जंक्शनवर रात्री उशीरा रेल्वे अपघात झाला होता. शकूरबस्तीवरून येणारी एक EMU लोकल मथुरा जंक्शन रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मचा बफर तोडून फलाटावर चढली होती. सर्व प्रवासी उतरल्याने ही लोकल रिकामी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दारुच्या अंमलाखालील रेल्वे कर्मचाऱ्यानी मोबाईल पाहण्याच्या नादामुळे हा अपघात घडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झाले. याप्रकरणी पाच जणांना सस्पेंड करण्यात आले आहे.