नवी दिल्ली: राज्यातील काही खासदार अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि राज्यातील भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार होणारा अवमान यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच खासदार उदयनराजे भोसले हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार असून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक, अनिल बोंडे, पियूष गोयल आणि प्रकाश जावडेकर हे महाराष्ट्रातील खासदार अचानक पतंप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटका दरम्यान सीमावादाची ठिणगी उडत आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या वादात तेल ओतण्याचं काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधांनासोबत या मुद्द्यावर महाराष्ट्रातील खासदार चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सीमावादाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना तंबी देण्याची विनंतीही मोदींकडे केली जाणार असल्याचं सांगितलं जातं.
या शिवाय खासदार उदयनराजे भोसले हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्यातील भाजप नेत्यांची मोदींकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं जात आहे. भगतसिंह कोश्यारी आणि राज्यातील भाजप नेते वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत आहेत. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही या बैठकीत केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मविआच्या नेत्यांच्या या भेटीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.