Dawood Ibrahim | मोठ्या दर्पोक्तीने सांगितलं दाऊद इथे नाही, आता पाकिस्तानची मोठी पंचाईत – उज्वल निकम

| Updated on: Dec 18, 2023 | 10:30 AM

पाकिस्तानी मीडियानेच या बातम्या चालवल्या आहेत की दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची मोठी पंचाईत झाली आहे.

Dawood Ibrahim | मोठ्या दर्पोक्तीने सांगितलं दाऊद इथे नाही, आता पाकिस्तानची मोठी पंचाईत - उज्वल निकम
Follow us on

मुंबई | 18 डिसेंबर 2023 : भारतातील मोस्ट वाँटेड आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. कराचीमध्ये दाऊद याच्यावर विषप्रयोग झाल्याचा दावा करण्यात आला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती देखील समोर येत आहे. दाऊदची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

दरम्यान 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा खटला हाताळणारे प्रसिद्ध वकील आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी दाऊदवर झालेल्या विषप्रयोगच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. दाऊदवर विषप्रयोग झाल्याची बातमी फक्त सोशल मीडियावरून पसरलेली नाही, तर पाकिस्तानमधील न्यूज चॅनेल्सनेही हे वृत्त चालवलं आहे. याच वृत्ताला आधार म्हणजे संपूर्ण पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत, असे उज्ज्वल निकम म्हणाले. साधारणपणे जेव्हा पाकिस्तानमध्ये अंतर्गत यादवी सुरू असते किंवा पाकिस्तानला जगापासून एखादी गोष्ट लपवायची असते, त्यावेळी पाकिस्तान सरकार संपूर्ण देशातील इंटरनेट सर्व्हिस बंद करतं,असे ते म्हणाले.

पाकिस्तानची मोठी पंचाईत

आता पाकिस्तानी मीडियानेच या बातम्या चालवल्या आहेत की दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची मोठी पंचाईत झाली आहे. कारण आत्तापर्यंत पाकिस्तानने अधिकृतपणे, परवेझ मुशर्रफ यांच्यासह मोठ्या दर्पोक्तीने सांगितलं की, कोण दाऊद इब्राहिम ? आम्ही त्याला ओळखत नाही, असा दावा त्यांनी केला होता. भारताला तो हवाय ? पण आमच्याकडे तो रहात नाही, अशा तऱ्हेची दर्पोक्ती मुशर्रफ यांनी यापूर्वीही केली होती.

दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने कट रचल्याचा पुरावा सादर केला

दाऊद इब्राहिम हा मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील वाँटेड गुन्हेगार आहे. मी हा खटला चालवला तेव्हा, दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने कसा कट रचला, याचा प्रत्यक्ष पुरावा आम्ही न्यायालयात दिला होता. पण पाकिस्तानचं पितळ उघड पडू नये म्हणून त्यांनी दाऊदला लपवलं, असं निकम म्हणाले.

पाकिस्तानची खरी पंचाईत इथेच झाली आहे. दाऊदला भारतानेच विषप्रयोग केला, असा खोटा आरोप पाकिस्तान करू शकत नाही, कारण दाऊद आमच्या भूमीत नाही हीच पाकिस्तानची अधिकृत भूमिका होती, असे निकम यांनी सांगितलं.