नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी आसामची राजधानी गुवाहाटी इथं केंद्रीय सशस्त्र पोलीस बल अर्थात CRPFचे जवान आणि त्यांच्या परिवारासाठी आयुष्यान भारत योजनेची सुरुवात केली. त्यावेळी शाह यांनी कोरोना लसीबाबत सुरु असलेल्या राजकारणावरुन विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. राजकारणासाठी दुसरे अनेक व्यासपीठ आहेत. तिथे या दोन हात करु, असं आव्हान शाह यांनी विरोधकांना दिलं आहे.( Amit Shah criticizes politicians over corona vaccine)
‘कोरोना लसीवरुन जे लोक राजकारण करत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की राजकारण करण्यासाठी दुसरे अनेक व्यासपीठ आहेत. तिथे या, दोन हात करु. लोकांच्या आरोग्याशी निगडीत गोष्टी आहेत. आपले शास्त्रज्ञांनी अपार कष्ट करुन लस बनवली आहे. त्यावर का राजकारण करत आहात?’ असा सवाल अमित शाह यांनी विचारला आहे.
‘CRPFच्या जवानांसाठी योजना सुरु करण्यासाठी आजसारखा दुसरा दिवस असू शकत नाही. सुभाष बाबू असं व्यक्तीमत्व होतं की, ज्यांना कुणी अवॉर्ड दिला नाही. जनता त्यांच्याशी नेताजीचा सन्मान जोडून त्यांचं स्मरण करते. नेताजींनी नारा दिला होता, ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुंगा’. हा नारा देशातील युवकांसाठी आजही चेतना आणि उत्साह भरतो. राष्ट्रभक्ती जागृत करतो. आयुष्मान योजनेद्वारे CRPFचे देशभरातील 10 लाख जवान आणि अधिकारी आणि 50 लाखाच्या आसपास त्यांचा परिवार देशातील 24 हजार रुग्णालयांमध्ये फक्त कार्ड स्वॅप करुन उपचार घेऊ शकणार आहेत’, असंही शाह यावेळी म्हणाले.
अमित शाह म्हणाले की, ‘2022 पर्यंत केंद्रीय सशस्त्र पोलिस बलातील कर्मचाऱ्यांचं समाधान 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा विचार आहे. दोन वर्षांपूर्वी हे प्रमाण 36 टक्के होतं. तर 2024 पर्यंत ते 65 टक्के करायचं आहे. आम्ही CAPF मध्ये 50 हजार जवानांची भरती करणार आहोत. पाच वर्षात CAPF मधून निवृत्त होणाऱ्या प्रत्येक जवानाच्या जागी भरती केली जाईल. त्यामुळे प्रत्येक जवान वर्षातील 100 दिवस आपल्या परिवारासोबत घालवू शकेल.’
संबंधित बातम्या :
Union Home Minister Amit Shah criticizes politicians over corona vaccine